राष्ट्रवादीचा एकही नेता तयार नव्हता, तेव्हा पवारांनी विचारले अन् मी मुंडेच्या विरोधात लढलो.. - When no NCP leader was ready, I fought against Munde at the behest of Pawar. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

राष्ट्रवादीचा एकही नेता तयार नव्हता, तेव्हा पवारांनी विचारले अन् मी मुंडेच्या विरोधात लढलो..

दत्ता देशमुख
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

व्यासपीठ आणि उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची अधिक संख्या पाहून ‘या सर्वांनीच कधी काळी भाजपचा प्रचार केला’ (दिवंगत मुंडेंच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अंधारातून त्यांना सहकार्य करत) मी तरी थेट भाजपचे आहे, असा टोलाही रमेशराव आडसकर यांनी लगलावला.
 

बीड : कोण कुठे राहतो, यापेक्षा काही नसूनही कोण काय काम करतो याला महत्व असते. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढायला त्यावेळी राष्ट्रवादीचा एकही नेता तयार नव्हता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विचारले आणि मी मुंडेंविरोधात लढलो, अशी आठवण भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी सांगितली.

माजलगावात दर्पण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सुत्रसंचलन करणाऱ्या पत्रकाराने रमेश आडसकर बोलण्यापूर्वी ‘आडसकर आहेत केज मतदार संघातील आडसचे, राहतात केजला, लढले माजलगावमधून’ अशी गुगली टाकली. त्यावर रमेश आडसकर यांनीही चांगलेच कोपरखळ्यांचे षटकार ठोकले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार प्रकाश सोळंके, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक आदींच्या उपस्थितीत पार पडलेलला हा कार्यक्रम चांगलाच रंगला. सोळंके यांचे होमपिच आणि रोहित पवारांची उपस्थिती असल्याने सहाजिकच व्यासपीठासह उपस्थितांमध्ये राष्ट्रवादीच्या मंडळींची अधिक संख्या होती. रमेश आडसकरांसारखे एखाद दुसरे भाजपचे होते. मात्र, आडसकरांनी या कार्यक्रमात एकहाती खिंड लढवली.

आडसचे राहणारे यावरुन त्यांनी त्यांचे राजकीय विरोधक प्रकाश सोळंके हे तर आपल्या सासुरवाडीत (हातोला, ता. अंबाजोगाईत) जन्मल्याचे जाहीर करुन टाकले. आडसकरांची सासुरवाडी ही सोळंके यांचे आजोळ आहे. याच वेळी त्यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीचीही आठवणही सांगितली. त्यावेळी सोळंके नेटकेच भाजपातून राष्ट्रवादीत आलेले होते.

आडसकर म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बीड लोकसभेबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. दिवंगत मुंडेंची ही पहिली लोकसभा निवडणुक होती. त्यांच्या विरोधात लढायला बीड राष्ट्रवादीतील एकही नेता तयार नव्हता. मी व अशोक डक शेवटच्या सोफ्यावर बसलेलो होतो. कोणीच तयार नसल्याचे पाहून आपण सहा फुट उंचीचे असल्याने शेवटी असलो तरी पवारांची नजर गेली आणि पवारांनी विचारले ‘रमेश तु उभारतो का’, त्यावर आपणही हो म्हणालो.

मात्र, देशात पराभूत उमेदवारांत सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम केल्याचेही त्यांनी खास रोहित पवारांना सांगीतले. रोहित पवार बारामतीचे पण कर्जत - जामखेडमधून लढले आणि जिंकले. पण, ते मोठ्याच लेकरु असल्याने त्यांच कौतुक होतं, अन॒ माझं गाव तर खेटून असतानाही आमची मात्र चर्चा (केज मतदार संघातील राहणारे आणि माजलगावमधून लढतात अशी) होते, अशी हस्यवजा खंतही आडसकरांनी व्यक्त केली.

सगळ्यांनीच भाजपचा प्रचार केला..

पण, माझ्या शाळा, माझी शेतीही याच मतदार संघात आहे, आता माझे गावही या मतदार संघात आणण्यासाठी दादांनी (रोहित पवार) प्रयत्न करावेत, अशी कोपरखळी त्यांनी मारली. मात्र, इथले लोक चांगले असल्याने निवडणुकीच्या तीन महिन्यांतच मलाही एक लाख मतदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. बसलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्यांची संख्या अधिक पाहून ’इथं बसलेल्या राष्ट्रवादीच्याच सर्वांनीच एकेकाकळी भाजपचा प्रचार केलेला आहे’ (दिवंगत मुंडेंच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मुंडेंना अंधरातून सहकार्य करत, आडसकरांच्या वेळी त्यांनाही असेच एकटे पाडले होते) मी तरी आता थेट भाजपात असल्याचे सांगताच उपस्थितांनी हसून त्यांच्या या वाक्याला दाद दिली.

आपण, अशोक डक आणि सुरेश धस या तिघांनीच अजित पवार यांना प्रथम जिल्ह्यात आणले. त्यानंतर त्यांचे नेतृत्व राज्यात झाले. आता हे दादा (रोहित पवार) जिल्ह्यात आले. त्यांचेही नेतृत्व भविष्यात राज्यात असेल, अशा शुभेच्छा द्यायलाही रमेश आडसकर विसरले नाहीत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख