इच्छुकांच्या प्रतिक्षेचा अंत, महापालिका निवडणुकीची घोषणा कधी? - Waiting for municipal elections, started working .. | Politics Marathi News - Sarkarnama

इच्छुकांच्या प्रतिक्षेचा अंत, महापालिका निवडणुकीची घोषणा कधी?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 जानेवारी 2021

एकंदरित महापालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी इच्छुक आणि सत्ताधारी, विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काॅंग्रेस- राष्ट्रवादी विरुध्द भाजप,एमआयएम, मनसे,वंचित अशी बहुरंगी लढत यावेळी पहायला मिळणार आहे.

औरंगाबाद ः गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुदत संपलेल्या महापालिकेची निवडणूक कोरोनामुळे तब्बल वर्षभर लांबली. कोरोनामुळे इच्छुकांनी मनाला मुरड घातली, पण संकटात संधी म्हणतात तसे इच्छुकांनी कोरोना काळात आपापल्या भागातील नागरिकांना शक्य ती मदत करून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. पण वार्ड रचना आणि आरक्षणाची याचिका आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने महापालिकेची निवडणूक कधी होणार? याबद्दलची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. कोरोनामुळे आधीच झालेला उशीर आणि आता न्यायालयाच्या निकालाची करावी लागणारी प्रतिक्षा यामुळे इच्छुकांचा जीव अक्षरशा मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद दौऱ्यात महापालिका निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता बोलून दाखवली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, याची जाणीव देखील सर्वांना आहे. राज्य सरकारच्या वतीने शहरात होत असलेली विकास कामांची उद्धाटन व भुमीपूजन पाहता महापालिका निवडणुका लवकरच होतील असे दिसत असले तरी अधिकृत घोषणेकडे राजकीय पक्ष व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या मुद्याभोवतीच निवडणुकीतील वातावरण तापणार असले तरी सत्ताधारी शिवसेनेने विकासकामे आणि भूमीपुजनांचा धडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ डिसेंबर रोजीच शहरासाठीच्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह सफारी पार्क, १५२ कोंटीच्या रस्त्यांची कामे यासह अनेक विकासकामांचा नारळ फोडला. हा महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचाच एक प्रकारे नारळ होता.

त्यानंतर महिनाभराने पुन्हा युवासेना अध्यक्ष व राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील कचरा प्रक्रिया प्रकल्प, सायकल ट्रॅक, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाचे लोकार्पण व इतर विकासकामांचे उद्धाटन केले.त्यामुळे शिवसेनेने महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येते. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील शिवसेनेला खिंडीत पकडण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

हिंदुत्व, संभाजीनगर आणि विकास...

गेली वीस पंचवीस वर्ष शिवसेने सोबत महापालिकेच्या सत्तेत असलेली भाजप आता या निवडणुकीत शिवसेनेचा प्रमुख विरोधक म्हणून मैदानात असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या भाजपच्या बैठकांमध्ये शिवसेनेला हिंदुत्व, संभाजीनगर आणि विकासकामांच्या मुद्यावरून खिंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

एकंदरित महापालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी इच्छुक आणि सत्ताधारी, विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काॅंग्रेस- राष्ट्रवादी विरुध्द भाजप,एमआयएम, मनसे,वंचित अशी बहुरंगी लढत यावेळी पहायला मिळणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख