जालना ः मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने नेमलेल्या गायकवाड समितीलाच सध्याच्या सरकारमधील एक मंत्री वडेट्टीवार बोगस म्हणतो, मग एसईबीसीचे आरक्षण कसे टिकेल? वडेट्टीवार हे जरा भावनिक झाले आहेत, त्यामुळे ते काहीही बोलतात, त्यांच्या तोंडाला आम्ही हात लावू शकत नाही. पण मग त्यांच्या पक्षाचे नेते, सरकारमधील मंत्री आणि स्वतः कट्टर मराठा नेते म्हणणारे अजित पवार गप्प का? असा सवाल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
अंबड तालुक्यातील साष्टीपिंपळगांव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी नरेंद्र पाटील आले होते. त्यानंतर जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा समाचार घेतांनाच मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील मराठा मंत्र्यांना देखील जाब विचारला.
पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आम्ही समाजा सोबत आहोत असे महाविकास आघाडी सरकार दाखवते आहे. पण ते केवळ मराठा समाजाला लाॅलीपाॅप देण्याचे काम करत आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात या सरकारला टिकवता आले नाही, सरकारकडून व्यवस्थीत बाजू मांडली जात नाही. उलट आधीच्या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या सवलती योजना देखील या सरकारने बंद करून टाकल्या.
सरकारमधील काॅंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार याच जालन्यात येऊन मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली गायकवाड समिती बोगस असल्याचे विधान करतात. वडेट्टीवार भावनिक झाले आहेत, ते काहीही बोलतात, त्यांच्या तोंडाला हात लावता येत नाही. पण स्वतःला कट्टर मराठा म्हणवून घेणारे अजित पवार गप्प का आहेेत? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना जाब का विचारत नाहीत? शिवसेनेचे मराठा मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत?
फडणवीस सरकारने जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गायकवाड समितीची नेमणूक केली होती, आणि वडेट्टीवार विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी या निर्णयाचे सभागृहात स्वागत केले होते. त्यावेळचे व्हिडिओ आणि त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया एकदा बघा. मग आता जर ते आयोगच बोगस आहे म्हणत असतील, तर कशाच्या आधारावर बोलतायं? त्यांचा अभ्यास आहे का? असेही पाटील म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare

