औरंगाबाद ः बलात्काराच्या आरोपात अडकलेले राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख या दोघांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी क्लीन चीट दिल्याचे आज स्पष्ट झाले. औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत देशमुख यांनी या दोन्ही प्रकरणाबाबत केलेली विधान त्यासाठी पुरेशी आहेत. औरंगाबादेतील ती तक्रार खोटी होती, व धनंजय मुुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचा राजकीय दबावासाठी वापर केला गेला, अशी कबुलीच तक्रारदार महिलेने शपथपत्रात दिली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
राज्यभरात गाजलेल्या धनंजय मुंडे व मेहबूब शेख यांच्या विरोधातील बलात्काराच्या तक्रारी खोट्या आणि राजकीय दबावासाठी करण्यात आल्या होत्या, अशी माहिती आज औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. विरोधकांकडून या दोघांना राज्य सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख करत असल्याचा आरोप होत असतांना आता खुद्द गृहमंत्र्यांनीच या दोन्ही नेत्यांना क्लीन चीट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शक्ती समितीच्या बैठकीसाठी देशमुख आज औरंगाबादेत आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना या नव्या कायद्या विषयची माहिती दिली. सहाजिकच धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांच्या विरोधातील तक्रारी संदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले. धनंजय मुंडे यांच्या विरोधात जी तक्रार दाखल करण्यात आली होती, त्या तक्रारीचा वापर विरोधकांनी राजकीय दबाव आणि फायदा उचलण्यासाठी केला गेला, अशी कबुलीच तक्रादार महिलेने आपल्या शपथपत्रात दिली असल्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यामुळे एखाद्या प्रकरणात महिलेची तक्रार खरी असेल, मग ती कितीही मोठ्या व्यक्तीच्या विरोधात असू देत, तिला न्याय मिळवून दिला जाईल. परंतु कुणाच्या विरोधात राजकीय दबावाला बळी पडू अत्याचार किंवा बलात्काराची तक्रार होत असेल तर अशा खोट्या तक्रार करणाऱ्या महिलांवर देखील कारवाई केली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
धनंजय मुंडेच्या बाबतीत झालेल्या तक्रारीत सदर महिलेला आपला राजकीय दबावासाठी वापर केला जात असल्याचे लक्षात आल्यामुळेच तिने तक्रार मागे घेतल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. एकंदरित राज्यभरात गाजलेल्या आणि या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी ही बाब महत्वाची समजली जात आहे. धनंजय मुंडे व मेहबूब शेख या दोंघानाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विधानातून क्लीन चीटच दिल्याचे स्पष्ट होते.
Edited By : Jagdish Pansare

