सचिन वाझेंना परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता

वाझे यांचे शिवसेनेशी संबंध होते, काही नेत्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध देखील आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून देखील ते काही काळ काम करत होते.
Devendra Fadanvis Press- Sachin Wajhe- Cm Udhav Thacekeray News
Devendra Fadanvis Press- Sachin Wajhe- Cm Udhav Thacekeray News

दिल्ली ः खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळ उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित झालेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना परत घेण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. एवढेच नाही तर शिवसेनेचे काही मंत्री मला येऊन देखील भेटले होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल करत निलंबित वाझे यांना पोलिस दलात पुन्हा घ्यावे, यासाठी २०१८ मध्ये आपण मुख्यमंत्री असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, शिवाय त्यांचे काही मंत्री देखील माझ्याकडे आले होते असा गौप्यस्फोट केला.

फडणवीस म्हणाले, वसई-विरारमध्ये खंडणी मागणाऱ्यांचे जे रॅकेट सापडले होते, त्यामध्ये एपीआय सचिन वाझे यांचे नाव होते. २००४ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले होते. २००७ मध्ये वाझे यांनी व्हीआरएस साठी अर्ज केला होता. पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा, निलंबनाची कारवाई होऊन चौकशी चालू असल्यामुळे त्यांना व्हीआरएस नाकारण्यात आली होती.

राज्यात आमची सत्ता आली आणि मी मुख्यमंत्री झालो तेव्हा सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यासाठी माझ्यावर शिवसेनेचा दबाव होता. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला फोन केला होता, त्यांचे काही मंत्री देखील माझ्याकडे आले होते. परंतु मला वाझे यांची संपु्र्ण माहिती असल्यामुळे मी या संदर्भात अॅडव्होकेट जनरल यांच्यांशी चर्चा केली. तेव्हा हायकोर्टाच्या आदेशाने निलंबन झालेले असल्यामुळे व वाझेंची चौकशी सुरू असल्याने त्यांना सेवेत घेणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी वाझेंना परत घेतले नाही.

वाझे यांचे शिवसेनेशी संबंध होते, काही नेत्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध देखील आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून देखील ते काही काळ काम करत होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर वाझे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. एक समिती नेमूण कोरोना काळात पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे हे कारण सांगून वाझे यांना व त्यांच्या मर्जीतल्या दोन-तीन अधिकाऱ्यांना परत सेवेत घेण्यात आले. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही चौकशी सुरू असलेल्या किंवा निलंबित केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना परत घेण्यात आले नाही, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

थेट सीआययू प्रमुख केले..

खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वाझे यांना सेवेत घेतल्यानंतर पीआयची बदली करून एपीआय असलेल्या वाझेंना सीआययूचे प्रमुख करण्यात आले. खरंतर त्यांना वसुली अधिकारी म्हणून ठेवण्यात आले होते. मुंबईतील डान्सबारला त्यांच्या काळात खुली सुट देण्यात आली होती. या सगळ्यांचे प्रमुख वाझे हेच होते, असा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केला.

मनसुख हिरेन यांची गाडी पोलिसांच्या माध्यमातून ठेवली जाते. मनसुख यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडल्या नाही. हे ठरवून आणि नियोजनपद्धतीने घडवून आणण्यात आले आहे. मनसूख हिरेन यांची स्कार्पिओ गाडी वाझे यांनी विकत घेतली होती. तीन-चार महिने गाडी वापरून देखील ते पैसे देत नव्हते.

मनसुख यांनी तगादा लावला तेव्हा त्यांना गाडी परत केली. पण पुन्हा ती मुलंड येथे पार्क करून चावी आणून देण्यास सांगितले गेलेत्यानंतर गाडी चोरीला गेल्याची तक्रार करण्यास सांगितले, ती पोलिसांना दाखल करून घेण्यास देखील वाझे यांनीच फोन करून सांगितल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

मनसुख प्रकणाचा तपासही एनआयएने करावा..

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप करत या प्रकरणात एटीएसकडून अपेक्षित कारवाई केली जात नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन घटनांचा एकमेकांशी संबध असल्याने याचा तपास देखील एनआयएने करावा, अशी मागणी देखील फडणवीस यांनी यावेळी केली.

सचिन वाझे हे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते, त्यामुळे ते जबाबदार होतेच, त्यांची सरकारने बदली केली असली तरी हे अपयश पोलीसांचे नाही तर सरकारचे आहे, अशी टीका करतांनाच वाझेंना आॅपरेट करणारे सरकारमध्ये बसलेले कोण आहेत, त्यांचे पाॅलिटिकल बाॅस कोण आहेत? याचा देखील शोध घेणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com