तीन वेळा आमदार तरी मंत्री झालो नाही, बनसोडे एकदाच निवडून आले अन् मंत्री झाले.. - Though MLA has not become a Minister three times, Bansod was elected only once and became a Minister. | Politics Marathi News - Sarkarnama

तीन वेळा आमदार तरी मंत्री झालो नाही, बनसोडे एकदाच निवडून आले अन् मंत्री झाले..

वैभव पाटील
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

आमदार विक्रम काळे जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा, तीन वेळा आमदार होऊनही मला मंत्रीपद मिळाले नाही. पण, बनसोडे साहेब एकदाच आमदार झाले, आणि त्यांना मंत्रीपदही मिळाले, असा चिमटा त्यांनी काढला. तेव्हा `तुम्हासही मंत्री करण्याचा प्रयत्न करतो` असे म्हणत बनसोडे यांनी त्यांना दाद दिली.

पळसप ः मी तीन वेळा आमदार झालो, पण मंत्रीपद मिळाले नाही, बनसोड पहिल्यांदाच निवडून आले अन् मंत्रीही झाले, असा चिमटा मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी काढला. त्यावर  राज्यमंत्री बनसोडे यांनी देखील तुम्हाला मंत्री करण्यासाठीही प्रयत्न करतो, अशी गुगली टाकली.

दिवंगत आमदार वसंतराव काळे यांच्या १५ व्या समृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. यावेळी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे पहिल्यांदाच निवडून आले आणि मंत्री झाले, मी मात्र तीनदा आमदार झालो तरी मंत्री झालो नाही, अशी मिश्किल टप्पणी आमदार विक्रम काळे यांनी केली. याच वेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार वैजिनाथ शिंदे यांच्याकडे कटाक्ष टाकत बनसोडे यांनी तुम्ही राष्ट्रवादीत आला असतात, तर आज मंत्री असता असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आल्याबद्दल महिनाभरापुर्वी औरंगाबादेत आमदार सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमात देखील विक्रम काळे यांनी मला किंवा सतीश चव्हाण यांना मंत्री करा, किती दिवस वाट पहायची असे म्हणत मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा काळे यांनी आपल्या मनातील खंत राज्यमंत्री बनसोडे यांच्या समोर व्यक्त केली.

राज्यमंत्री बनसोडे यांनी राजकीय टोलेबाजीला सुरूवात केली.  माजी आमदार वैजिनाथ शिंदे यांना उद्देशून ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला असता तर आतापर्यंत मंत्री झाला असता. मी योग्य वेळी निर्णय घेतला, राष्ट्रवादीत आलो आणि मंत्री झालो. वैजिनाथ शिंदे यांनाही मी सोबत आणत होतो, पण ते आले नाही, अन्यथा ते ही मंत्री झाले असते.

दिवंगत नेते वंसत काळे यांनी अनेक सामान्य कार्यकर्ते घडविले. त्याच्याकडूनच मलाही राजकीय शिक्षण मिळाले. मी मंत्रीपदापर्यंत पोहचलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने मला मंत्रीपद मिळाले, याचा पुनरुच्चार देखील बनसोडे यांनी केला. दरम्यान हाच धागा पकडत आमदार विक्रम काळे जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा, तीन वेळा आमदार होऊनही मला मंत्रीपद मिळाले नाही. पण, बनसोडे साहेब एकदाच आमदार झाले, आणि त्यांना मंत्रीपदही मिळाले, असा चिमटा त्यांनी काढला. तेव्हा `तुम्हासही मंत्री करण्याचा प्रयत्न करतो` असे म्हणत बनसोडे यांनी त्यांना दाद दिली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख