पुन्हा येईन म्हणणारे आता परत येणार नाहीत, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला - Those who say they will come again will not come again, Ashok Chavan told Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

पुन्हा येईन म्हणणारे आता परत येणार नाहीत, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 जानेवारी 2021

येणाऱ्या काळात जिल्ह्याला निधीची कमतरता कधीच भासणार नाही. राज्यातील आघाडी सरकार भक्कम आहे, सरकारची वाटचाल अगदी व्यवस्थीत सुरू  आहे. त्यामुळे मी परत येणार म्हणणारे आता कधीच परत येणार नाही, म्हणून तुम्ही काळजी करू नका.

औरंगाबाद ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार अगदी व्यवस्थीत काम करत आहे, भक्कमपणे सरकार विकासाच्या दृष्टीने दमदार पावलं टाकत आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन, परत येणार असे म्हणणारे काही परत येणार नाही, असा टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यांची सवय लागली होती, ते देखील मी परत येणार म्हणत होते, पण तेही  गेले, असा चिमटा देखील चव्हाण यांनी काढला.

नांदेड जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमीपुजन अशोक चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. धर्माबाद येथे रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्गांच्या कामाला मंजुरी मिळाल्याचे सांगतानाच तुम्ही एक पूल मागितला मी तुम्हाला दोन दिले. आता वरूनही जा आणि खालूनही जा, असे म्हणत त्यांनी जिल्ह्यासाठी मंजुर केलेल्या कामांची यादीच उपस्थितांसमोर मांडली.

अशोक चव्हाण म्हणाले, कोरोनाचे संकट टळले असले तरी ते पुर्णपणे अजून गेलेले नाही. पण इथे तर एकानेही मास्क घातला नाही, जणू काही झालेच नाही असेच सगळे चित्र आहे. पण मी, अमर राजूकरर या आजारातून गेलो आहे. परत येईन का नाही, याची देखील खात्री नव्हती, पण सुखरूप यातून बाहेर निघालो. आता तर बर्ड फ्लू आलायं. त्यामुुळे सगळ्यांनी चिकन सोडून मटनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. पण निष्काळजीपणा करू नका.

वर्षभर कोरोनामुळे विकासकामे करता आली नाहीत, पण आता झपाट्याने ती होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील अनेक विकासकांमाना मंजुरी आणि निधी दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याला निधीची कमतरता कधीच भासणार नाही. राज्यातील आघाडी सरकार भक्कम आहे, सरकारची वाटचाल अगदी व्यवस्थीत सुरू  आहे. त्यामुळे मी परत येणार म्हणणारे आता कधीच परत येणार नाही, म्हणून तुम्ही काळजी करू नका.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते, उड्डाणपूल आणि इतर विकासकामे वेगाने होत आहे. नांदेडला आपण समृद्धी महामार्गाला जोडण्याचे काम केले आहे. नांदेडहून औरंगाबादला जाण्यासाठी साडेचार पाच तास आधी लागायचे, पण आता आपण आणखी एक नवा रस्ता करतो आहोत, ज्यामुळे फक्त अडीच तासांतच औरंगाबादला पोहचणे शक्य होणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी उपस्थितांना सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख