त्या`संबंधाची जाहीर कबुली दिल्यामुळे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही.. - There is no question of Dhananjay Munde's resignation due to his public confession | Politics Marathi News - Sarkarnama

त्या`संबंधाची जाहीर कबुली दिल्यामुळे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

मुंडे यांनी जर हे प्रकरण दडवले असते, त्यावर कुठलेच भाष्य केले नसते, त्यांच्यावर शंका उपस्थित केली गेली असती तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी कुठेही या संबंधाचा इन्कार केलेला नाही, उलट जाहीर कबुलीच दिली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याची गरज नसल्याचा पुनरुच्चार सत्तार यांनी केला.

जालना ः धनंजय मुंडे यांनी त्या महिले सोबत असलेल्या संबंधाची जाहीरपणे कबुली दिली आहे. ट्विट आणि फेसबुकच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष परस्परांच्या सहमतीने आम्ही एकत्रित होतो याची कबुली मुंडे यांनी जगजाहीर दिली आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईत एका तरूणीने बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुकच्या माध्यमातून या संबंधाची जाहीर कबुली देत ब्लॅकमेल करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचा दावा केला होता. या तरूणी व तिच्या बहिणीच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केल्याचा खुलासा मुंडे यांनी केला होता.

मात्र या प्रकरणावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने धनंजय मुंडे यांना घेरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपातून निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत मुंडे यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तर मुंडे यांनी तात्काळा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना मुंडे यांची पाठराखण केली.

सत्तार म्हणाले,  धनंजय मुंडे यांनी सदर महिले सोबत असलेल्या संबंधाची कबुली ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सहमतीने त्यांच्यात संबंध होते, यातून त्यांना दोन मुलं देखील झाली. परंतु पैशासाठी सदरची महिला व तिची बहिण आपल्याला ब्लॅकमेल करत आहे, आणि म्हणून आपल संबंधितांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याचे देखील मुंडे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले. जगजाहीर कबुली दिल्यामुळे धनंजय मुंडे यांचा भाजपने राजीनामा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मुंडे यांनी जर हे प्रकरण दडवले असते, त्यावर कुठलेच भाष्य केले नसते, त्यांच्यावर शंका उपस्थित केली गेली असती तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी कुठेही या संबंधाचा इन्कार केलेला नाही, उलट जाहीर कबुलीच दिली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याची गरज नसल्याचा पुनरुच्चार सत्तार यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख