कुणाला काय म्हणायचं ते म्हणा, नामांतराच्या मुद्याकडे मी गांभीर्याने पाहत नाही.. - Tell someone what to say, I don't take the issue of renaming seriously. | Politics Marathi News - Sarkarnama

कुणाला काय म्हणायचं ते म्हणा, नामांतराच्या मुद्याकडे मी गांभीर्याने पाहत नाही..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर प्रसार माध्यमांशी बोलतांना औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर सरकारची भूमिका काय असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. तेव्हा कुणाला काय म्हणायचे ते त्यांनी म्हणावे, मला तो प्रश्न इतका गंभीर आणि महत्वाचा वाटत नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.

औरंगाबाद ः औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण सीएमओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून झाल्यानंतर यावरून शिवसेना- विरुध्द काॅंग्रेस असा संघर्ष पुन्हा उडण्याची शक्यता आहे. यातच या शहराच्या नामांतरावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र रोखठोक भूमिका मांडली आहे. `कुणाला संभाजीगर म्हणायचे तर म्हणा, कुणाला धाराशीव म्हणायचे तर म्हणा, मी मात्र या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही`, अशा शब्दांत पवारांनी हा विषय टोलवला.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी रेटली जात आहे. या शहराचे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केले आहे, त्यावर त्यांचे पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच शिक्कामोर्तब करतील असा दावा देखील शिवसेना नेत्यांकडून केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती देतांना या शहरांचा उल्लेख अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशीव केला होता.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या विभागाशी संबंधित निर्णयाचा माहिती देतांना आधी औरंगाबादचा संभाजीनगर आणि उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मंजुर केल्यानंतर त्याचा उल्लेख देखील धाराशीव असा सीएमओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून करण्यात आला होता. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबद्दल ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केल्यावर ही ट्विटरचे काम पाहणाऱ्या आॅपरेटरची होती, ते चूकन टाकण्यात आले, अशी सारवासारव करण्यात आली होती.

पण उस्मानाबादच्या बाबतीत पुन्हा तोच प्रकार घडला, शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आपल्या भाषणात संभाजीनगर आणि धाराशीव असाच उल्लेख करतात. यावरून शिवसेना-काॅंग्रेसमध्ये खटके उडत असतांना राष्ट्रवादीने मात्र सामंजस्याची भूमिका घेत एकत्रितपणे यावर निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. परंतु आता शरद पवार यांनी आपण या विषायकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे सांगत एकत्रित चर्चा करून निर्णय घेण्याच्या अजित पवारांचे विधानच खोडून काढले.

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर प्रसार माध्यमांशी बोलतांना औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर सरकारची भूमिका काय असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. तेव्हा कुणाला काय म्हणायचे ते त्यांनी म्हणावे, मला तो प्रश्न इतका गंभीर आणि महत्वाचा वाटत नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.

एकीकडे शिवसेना संभाजीनगर, धाराशीव हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असे म्हणत नामांतरासाठी आग्रही आहे, औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब करून तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र औरंगाबादचे संभाजीगनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्यावर मात्र शरद पवारांनी टीका करत शिवसेनेला टोला लगावल्याची चर्चा या निमित्ताने होते आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख