गिरीश महाजनांचे फर्दापूर रेस्टहाऊसचे किस्से जगजाहीर : खडसेंचा आता `नाजूक` वार - Tales of Girish Mahajan of Fardapur Rest House are world famous snubs Khadase | Politics Marathi News - Sarkarnama

गिरीश महाजनांचे फर्दापूर रेस्टहाऊसचे किस्से जगजाहीर : खडसेंचा आता `नाजूक` वार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

एका क्लिपमुळे दोघांत वाद सुरू झाला... 

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे शाब्दिक युद्ध जोरदार सुरू आहे. खडसे यांनी पुन्हा महाजन यांच्यावर वार केले असून सन 1994 पासूनचे फर्दापूर रेस्ट हाऊस वरील महाजन यांचे किस्से जगजाहीर आहेत, असा खोचक टोला लगावला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन हे पश्चिम बंगाल येथे भाजप उमेदवारांचा प्रचार करून जळगावात परतले, त्यानंतर ते नाशिक येथे रवाना झाले. इकडे त्यांच्या मतदारसंघातील कोरोना स्थितीवरून एक क्लिप व्हायरल झाली. त्याची परिणती  खडसे व महाजन  यांच्या शाब्दिक युद्धात झाली. या क्लिपवरून नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सणसणीत उत्तर देत खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे त्यांनी म्हटले. त्याला खडसेंनी तसेच प्रत्युत्तर दिले. 

खडसे यांनी ही महाजन यांना तेवढ्याच तडफेने उत्तर दिले, ते म्हणाले, ``मी ठणठणीत आहे, ज्यांना शंका असेल त्यांनी आपणास प्रत्यक्ष येऊन भेटावे. जामनेर तालुक्यात कोरोना ने रोज 25 ते 30 लोक मृत्यू पावत आहेत. त्यातच त्या ठिकाणी पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. मला तालुक्यातून रोज नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्याची ही परिस्थिती असताना आमदाराने तालुक्यात राहणे गरजेचे आहे. मात्र महाजन इकडे तिकडे फिरत असतात त्यामुळे आपण साहजिकच फोनवर खान्देशी भाषेत बोललो. तुमचा आमदार कुठे फिरतोय, असे विचारले. त्यात एवढे वेगळे काय होते? आणि आमदार महाजन यांचे 1994 पासूनचे फर्दापूर रेस्ट हाऊस वरील किस्से जगजाहीर आहेत. त्यांनी मला आमदारकी मिळाली नाही, म्हणून मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले आहे. मात्र मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतोच! त्यामुळे मला आमदारकीचे काहीही वाटत नाही, आजही आपला आमदारकीचा रुबाब आहेच.``

भांडण कशाने सुरू झाले?

एका नागरिकाने खडसे यांना फोन करून महाजन यांच्या मतदारसंघातील समस्या मांडल्या. त्यावेळी खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने तुमचे आमदार कोठे आहेत, हे विचारताना वेगळेच शब्द वापरले. तसेच महिलेचा फोन असता तर महाजनांनी उचलला असता, असा टोलाही लगावला. ही क्लिप व्हायरल झाली. यावर महाजन यांची प्रतिक्रिया विचारली असता खडसे यांचा इलाज मला करावा, लागेल असे प्रत्युत्तर दिले. तसेच खडसेंची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीनजिक अजिंठ्यानजिक फर्दापूर हे गाव आहे. अजिंठ्याला जाणारे अनेक पर्यटक येथे थांबत असतात. येथे असलेल्या रेस्ट हाऊसचा उल्लेख करून खडसे यांनी हा वाद आता वेगळ्याच वळणावर नेला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख