अशोक चव्हाणांच्या प्रयत्नांना यश, नांदेडही आता समृद्धी महामार्गाला जोडणार..

समृद्धी महामार्ग ते नांदेड शहरापर्यंतच्या रस्त्याचा खर्च अंदाजे ५ हजार ५०० कोटी रूपये आणि नांदेड शहरांतर्गत रस्ते व पुलासाठी लागणारा अंदाजित खर्च १ हजार कोटी रूपये असे एकूण साडेसहा हजार कोटी रूपयांचे हे प्रकल्प म्हणजे मकरसंक्रांतीच्या पर्वावर महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने नांदेड आणि मराठवाड्याला दिलेली मोठी भेट असल्याचेही अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.
Minister ashok chvan news nanded
Minister ashok chvan news nanded

मुंबई : नांदेड शहराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली असून, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे एकूण सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या तात्विक मान्यतेची माहिती दिली आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले गेले पाहिजे, ही माझी मनःस्वी इच्छा होती. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या निर्णयान्वये समृद्धी महामार्गावरील जालना टी-पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा समृद्धी महामार्गाला थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल.

या प्रकल्पामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी १९४ किमी असून, त्यासाठी अंदाजित खर्च ५ हजार ५०० कोटी रूपये असेल. या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी गुरूवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणे शक्य होईल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकचा भाग म्हणूनच नांदेड शहरातही रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नांदेड शहरातील हिंगोली गेट - बाफना चौक - देगलूर नाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) या रस्त्याची सुधारणा, उड्डाण पूल व देगलूर नाक्यानजिक गोदावरी नदीवरील पूल ही कामे देखील या प्रकल्पाचा भाग म्हणून केली जाणार आहेत. या कामांनाही यावेळी तत्वतः मंजुरी देण्यात आली. ही कामे सुमारे १ हजार कोटी रूपयांची आहेत.

विशेष म्हणजे नांदेड शहरातील या नवीन रस्त्यांचा व पुलाचा वापर करण्यासाठी नांदेडकरांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही. समृद्धी महामार्ग ते नांदेड शहरापर्यंतच्या रस्त्याचा खर्च अंदाजे ५ हजार ५०० कोटी रूपये आणि नांदेड शहरांतर्गत रस्ते व पुलासाठी लागणारा अंदाजित खर्च १ हजार कोटी रूपये असे एकूण साडेसहा हजार कोटी रूपयांचे हे प्रकल्प म्हणजे मकरसंक्रांतीच्या पर्वावर महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने नांदेड आणि मराठवाड्याला दिलेली मोठी भेट असल्याचेही अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. 

हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी यापुढेही मोठे काम करावे लागणार आहे. नागरिकांचे सहकार्य आणि आशीर्वादाच्या बळावर हे काम लवकर पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

-  नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडल्यामुळे दळणवळण सुलभ होणार

- नांदेड ते मुंबई व औरंगाबाद प्रवासात वेळ व पैशांची बचत होणार-

-  मालवाहतूकीचाही लाभ, थेट जेएनपीटीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार

-  स्थानिक व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध, विकासाला चालना

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com