औरंगाबादेत शिवसेनेचा पहिला महापौर कसा झाला, त्याची ही कहाणी.. - This is the story of how Shiv Sena became the first mayor in Aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादेत शिवसेनेचा पहिला महापौर कसा झाला, त्याची ही कहाणी..

जगदीश पानसरे
बुधवार, 20 जानेवारी 2021

१९८८ ते ९३ या पाच वर्षाच्या काळात कॉंग्रेसचे शांताराम काळे, अपक्ष मोरेश्वर सावे, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, कॉंग्रेसचे मनमोहनसिंग ओबेरॉय, अशोक सायन्ना यांनी प्रत्येकी एक वर्ष महापौर पद भूषवले. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसला मिळालेली तीन वर्षांची संधी वगळता त्यांनतरची २७ वर्ष महापालिकेत सर्वाधिक महापौर हे शिवसेनेचे राहिले.

औरंगाबाद : आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर असा नावललौकिक असलेल्या औरंगाबाद शहराच्या स्थानिक राजकारणात शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला आहे. ५२ दरवाजांचे शहर अशी ऐतिहासिक ओळख जपलेल्या शहराचा कारभार स्वातंत्र्य पुर्व काळात १९३६ मध्ये स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या माध्यमातून पाहिला जात होता. कलांतराने शहराच्या आजूबाजूच्या खेड्यातून लोक रोजगारासाठी येऊ लागले आणि शहर विस्तारत गेले. द्वारकादास पटेल हे नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते. 

४६ वर्षानंतर ८ डिसेंबर १९८२ रोजी नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झाले. सुरुवातीची पाच वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. शहरावर कॉंग्रेस व त्यांच्यासोबत असलेल्या आघाडीचे वर्चस्व होते. परंतु विशिष्ट समाजाची दहशत, त्याला त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांकडून घातले गेलेले खतपणी यातून शहराच्या राजकारणात शिवसेने सारख्या प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या पक्षाचा जन्म झाला.

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फोफावत चाललेली शिवसेना औरंगाबादेत झपाट्याने आली आणि रुजली देखील. महापालिकेच्या पहिल्याच  १९८८ च्या निवडणुकीत शिवसेनेने उडी घेतली. पक्ष स्थापन झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या शिवसेनेला पहिल्याच प्रयत्नात अभूतपुर्व यश मिळाले.

६० नगरसेवकांच्या महापालिका सभागृहात शिवसेनेचे तब्बल २८ नगरसेवक निवडूण आले होते. महापौर पद पटकावत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता, पण तो शहरावर पकड असलेल्या कॉंग्रेस, मुस्लिम लीग, भारिप आणि गाडे गटाच्या रिपाइं आघाडीने हाणून पाडला. त्यामुळे महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान कॉंग्रेसच्या शांताराम काळे यांना मिळाला. अर्थात या निवडणुकीत मोठे राजकीय नाट्य घडले आणि त्यानंतर शहरात पहिली जातीय दंगल देखील उसळली.

अन जैस्वालांनी मतपेटीच पळवली..

१९८८ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे २८ तर कॉंग्रेस आघाडीचे ३२ नगरसेवक निवडूण आले होते. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा तत्कालीन कॉंग्रेसचे नेते विलासराव देशमुख आणि अमानउल्ला मोतीवाला यांनी शांताराम काळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी असलेल्या अंलकार हॉलमध्ये जेव्हा निवडणूक प्रकिया सुरु झाली तेव्हा शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप जैस्वाल यांनी आक्षेप नोंदवला.

पण तो फेटाळण्यात आल्याने जैस्वाल यांनी थेट मतपेटीच उलचली आणि सभागृहाबाहेर नेली. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सभात्याग केला आणि त्यानंतर उपस्थित कॉंग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मतदान केले. शिवसेनेने मतदानावरच बहिष्कार टाकल्यामुळे शांताराम काळे महापौर तर मुस्लीम लीगचे तकी हसन पहिले उपमहापौर बनले.

१९८८ ते ९३ या पाच वर्षाच्या काळात कॉंग्रेसचे शांताराम काळे, अपक्ष मोरेश्वर सावे, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, कॉंग्रेसचे मनमोहनसिंग ओबेरॉय, अशोक सायन्ना यांनी प्रत्येकी एक वर्ष महापौर पद भूषवले. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसला मिळालेली तीन वर्षांची संधी वगळता त्यांनतरची २७ वर्ष महापालिकेत सर्वाधिक महापौर हे शिवसेनेचे राहिले. मोरेश्वर सावे हे अपक्ष म्हणून निवडूण आले असले तरी ते शिवसेने सोबतच होते, त्यामुळे शिवसेनेकडून पहिले महापौर होण्याचा मान देखील त्यांना देण्यात आला होता.

१९९८८ ते २०२० या काळात शिवसेनेकडून मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शिला गंजाळे, सुदाम सोनवणे, विकास जैन, विमल राजपूत, रुख्मणी शिंदे, किशनचंद तनवाणी, अनिता घोडेले, कला ओझा, त्र्यंबक तुपे आणि नंदकुमार घोडेले यांनी महापौर पद भूषवले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख