औरंगाबाद ः मुंबईतील एका महिलेने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केल्यामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. तुर्तास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांना अभय दिले आहे. पण मुंडे यांच्यावरची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी औरंगाबादेत मराठवाडा पदवीधरचे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार सतीश चव्हाण यांना मंत्री करण्याची मागणी त्यांच्याच गौरव संमारंभातून पुढे आली. शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी ही मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या समक्षच केल्याने अनेकांच्या भुवया उंचावलल्या. आता ही मागणी केली की करायला लावली, याबद्दल तर्क लढवले जात आहेत.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजय मिळवला. याबद्दल त्यांचा गौरव सुप्रिया सुळे यांच्या हस्ते एमजीएमच्या रुख्मणी सभागृहात करण्यात आला. या सोहळ्याचे संयोजक आमदार विक्रम काळे यांनी यावेळी अचानक एक मागणी केली आणि सभागृहातील सगळेच अवाक झाले. खुद्द सतीश चव्हाण यांना देखील हा धक्काच होता हे त्यांच्या एकंदरित देहबोलीतून लक्षात आले.
सुप्रिया सुळे व्यासपीठावर उपस्थित असतांना विक्रम काळे म्हणाले, ताई आता मला आणि सतीश चव्हाणांना मंत्री कराच, आणखी किती दिवस वाट पहायची. माझ्या आधी आमच्या एका कार्यकर्त्याने आपल्या भाषणातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो घाबरत बोलला. पण आता आमची देखील मागणी आहे, दोघांना शक्य नसेल, तर सिनियर म्हणून सतीश चव्हाणांना आधी मंत्री करा, किंवा अडीच-अडीच वर्षांचा फाॅर्म्युला वापरून दोघांना संधी द्या शक्य झाले तर शिक्षण खातेच द्या, म्हणजे शिक्षक, विद्र्याथी आणि प्राध्यापकांचे प्रश्न आम्हाला सोडवता येतील.
हा फाॅर्म्युला तुम्हीच अंमलात आणू शकता, असे म्हणत आमच्यापैकी कुणाला तरी मंत्रीपदाची संधी द्याच, अशी आग्रही मागणी विक्रम काळे यांनी केली. विशेष म्हणजे सतीश चव्हाण यांना मंत्री करा, अशी काळेंनी मागणी केली तेव्हा सतीश चव्हाणांचा चेहरा मात्र पडला होता. धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात आलेले असतांना विक्रम काळे यांच्याकडून अशा प्रकारची जाहीर मागणी, ती देखील नेत्या सुप्रिया सुळे यांच्या समक्ष झाल्याने सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का बसला.
मला नको काळेंना मंत्री करा..
काळेंच्या या अचानक झाले्ल्या मागणीने गोंधळलेल्या सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणाच्या वेळी सारवासारव केली. मंत्रीपदाची मागणी मी नाही तर विक्रम काळेंनी केली आहे. मला मंत्रीपद नको, करायचेच असेल तर त्यांनाच करा, असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही मंत्रीपद मिळावे या आशेने काम करत नाही, राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मागितल्याने कधी काही मिळत नाही, न मागता खूप काही मिळते, असे सांगत त्यांनी मंत्रीपदाची मागणी आपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
एकदंरित सतीश चव्हाण यांच्या गौरव सोहळ्यात इतर कुठल्या विषयापेक्षा विक्रम काळे यांनी केलेल्या मंत्रीपदाच्या मागणीचीच चर्चा सर्वाधिक झाली. आता सुप्रिया सुळे ही मागणी पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्याकडे मांडणार आहेत. यावर पक्षाचे नेते किती गांभीर्याने विचार करतील हे येणार काळच ठरवणार आहे.
Edited By : Jagdish Pansare