संसदेत कायदा करणाऱ्या सदस्यांनीच तो मोडावा का? खासदार जाधवांना दुर्राणींचा सवाल.. - Should it be broken by the lawmakers in Parliament? Durrani's question to MP Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

संसदेत कायदा करणाऱ्या सदस्यांनीच तो मोडावा का? खासदार जाधवांना दुर्राणींचा सवाल..

गणेश पांडे
गुरुवार, 14 जानेवारी 2021

ज्या संसदेत कायदा तयार होतो, त्याची अमलबाजावणी संपू्र्ण देशात केली जाते, त्याच संसदेचे संजय जाधव हे सदस्य आहेत. मग त्यांनीच कायदा मोडावा ही गोष्ट आहे, असा टोला देखील दुर्राणी यांनी लगावला. यात कुठेही राजकीय द्वेष किंवा षडयंत्र नाही,. राजकीय मतभेद असू शकतात असेही दुर्राणी यांनी स्पष्ट केले.

परभणी ः काळे कुटूंबिय माझ्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. त्यामुळे या प्रकरणात मी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देवून चौकशीची मागणी केली होती. परंतू हिंदू कायद्याप्रमाणे वडिलांच्या संपतीमध्ये मुलींचाही तितकाच हक्क आहे. परंतू कायदा करणाऱ्या संसदेचे सदस्यांनीच तो मोडावा का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी खासदार संजय जाधव यांच्या आरोपावर पलटवार केला आहे.

एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील शेतजमीन खरेदी - विक्री प्रकरणात आता राजकीय सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने रामप्रसाद काळे यांच्या मालकीची जमीन ४४ लाख ५३ हजार रुपयांना खरेदी केली आहे. या जमीनाचा पूर्ण व्यवहार हा पारदर्शक व नियमाने झाला असल्याचे जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. परंतू या खरेदी विक्रीवरून राजकारण करून राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचून बदनामी केल्याचा  आरोप त्यांनी केला आहे. 

यावर बाबाजानी दुर्राणी यांनी जाधव यांनाच कायद्याचा दाखला देत खडेबोल सुनावले. दुर्राणी म्हणाले, रामप्रसाद काळे यांच्या पत्नी, मुली व सुनबाई माझ्याकडे तक्रार घेवून आल्या होत्या. त्यांची शेतजमीन खासदार संजय जाधव यांनी परस्पर खरेदी केली, अशी त्यांची तक्रार होती. या प्रकरणात मी सदर कुटूंबाला न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. या पत्रात या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यात राजकारण कुठे आले?

खरे तर जमीन खरेदी विक्री करतांना कुटूंबातील व्यक्तीची सहमती आवश्यक असते. परंतू या व्यवहारात असा नियम पाळला गेला नसल्याचे दिसते. हिंदू कायद्याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा समान वाटा असतो. परंतू या कुटूंबातील सर्व व्यक्तींना आंधारात ठेवून हा व्यवहार झाला. आश्चर्याची ज्या संसदेत कायदा तयार होतो, त्याची अमलबाजावणी संपू्र्ण देशात केली जाते, त्याच संसदेचे संजय जाधव हे सदस्य आहेत. मग त्यांनीच कायदा मोडावा ही गोष्ट आहे, असा टोला देखील दुर्राणी यांनी लगावला. यात कुठेही राजकीय द्वेष किंवा षडयंत्र नाही,. राजकीय मतभेद असू शकतात असेही दुर्राणी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख