राज्यमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमध्ये ५७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा.. - Shiv Sena's saffron on 57 gram panchayats in Sillod of Minister of State Sattar .. | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमध्ये ५७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

या निवडणुकीत प्रभाकर पालोदकर यांची पालोद,माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांची मांडणा, भाजपचे श्रीरंग साळवे यांची वांगी बु, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर यांची सिसारखेडा या ग्रामपंचायती देखील शिवसेनेने ताब्यात घेतल्या आहेत.

औरंगाबाद ः ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सिल्लोड तालुक्यात शिवसेनेचा भगवा बहुतांश ग्रामंपचायतीवर फडकणार हा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा अखेर खरा ठरला आहे. तालुक्यातील ८३ पैकी ५७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश करत सत्तार यांनी मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

आज झालेल्या सरपंच- उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत ५७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे. नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांचाअब्दुल सत्तार यांच्या हस्ते  सेना भवन येथे सत्कार करण्यात आला.

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात आतापर्यंत काॅंग्रेस विरुध्द भाजप असा थेट सामना व्हायचा. या दोन पक्षाशिवाय अन्य कुठल्या पक्षाला गेल्या कित्येक वर्षात तालुक्यात पाय रोवता आले नाही. पण लोकसभा निवडणुकीच्या नंतर सत्तार यांनी काॅंग्रेसला रामराम ठोकला आणि नव्या पर्यायांचा शोध सुरू केला. भाजपमध्ये जाता जाता ते शिवसेनेत म्हणजेच अगदी विरोधी विचारसरणीच्या पक्षात दाखल झाले. पण जिथे जाईल तिथे जुळवून घेण्याचा आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा स्वभाव असलेल्या सत्तारांनी शिवसेनेत देखील आपले वजन वाढवले. 

नवी विचारसरणी, नेते, कार्यकर्ते यांच्याशी जुळवून घेत सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय तर मिळवलाच, पण ज्या सिल्लोड तालुक्यात कधी शिवसेना औषधालाही नव्हती ती शिवसेना आता गाव, वाडी, तांड्यावर पोहचवली. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सत्तार यांना राज्यमंत्रीपद मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांचा योग्य सन्मान केल्यानंतर आता संपुर्ण मतदारसंघ शिवसेनामय करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. 

राज्यातील सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सत्तार यांनी आपले वर्चस्व सिध्द केल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्याचा सत्तार यांनी केलेला दावा प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र आहे. सरपंच उपसरपंच पदाच्या आजच्या निवडणुकीत निम्याहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच-उपसरपंच निवडून आले आहेत.

इथे फडकला भगवा..

खातखेडा / धोंडखेड , दिडगाव, बोरगाव सारवणी, म्हसला बु.,म्हसला खु., सिसारखेडा, अजिंठा, अनाड, खंडाळा, जळकी वसई , बोदवड, मुखपाठ, वसई जळकी, सराटी, अंभई , केळगाव /आधारवाडी, पांगरी, पिंपळगाव घाट /शेखपूर, सिरसाळा, सिरसाळा तांडा, कोटनांद्रा, घाटनांद्रा, जळकी घाट /बोजगाव, तळणी, देऊळगाव बाजार, धारला , पेंडगाव, अन्वी, डोंगरगाव, दहीगाव, पालोद, बहुली , मांडणा, रहिमाबाद, केरहाळा, धानोरा / वांजोळा, मंगरूळ, वडाळा, वदोडचाथा, वांगी खु, वांगी बु,सासुरवाडा, कायगाव, गव्हाली, गेवराई सेमी, चिंचखेडा, तळवाडा, पिंप्री /वरुड, बनकीन्होळा, बाभूळगाव, वरखेडी / भयगाव, वरुड खुर्द, आमसरी, डीग्रस, पांनवडोद खुर्द, शिवना, पानवडोद बु, वाघेरा / नाटवी या गावांमध्ये शिवसनेनेचे सरपंच व उपसरपंच विजयी झाले आहेत.

दिगजांच्या ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात..

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत प्रभाकर पालोदकर यांची पालोद,माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांची मांडणा, भाजपचे श्रीरंग साळवे यांची वांगी बु, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर यांची सिसारखेडा या ग्रामपंचायती देखील शिवसेनेने ताब्यात घेतल्या आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख