इंधन दरवाढी विरोधात मोर्चा काढण्याची नौटंकी शिवसेनेने करू नये, कर कमी करावेत.. - Shiv Sena should not do the gimmick of taking out a morcha against fuel price hike, taxes should be reduced .. | Politics Marathi News - Sarkarnama

इंधन दरवाढी विरोधात मोर्चा काढण्याची नौटंकी शिवसेनेने करू नये, कर कमी करावेत..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

राम मंदिराच्या उभारणीसाठी पैसा जनतेने द्यायचा की सरकारने यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत लेख लिहतात, पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या राऊतांना शरजील उस्मानी याच्या विधानवर लेख लिहावा वाटला नाही, याचे आश्चर्य वाटते, असा चिमटा देखील फडणवीस यांनी काढला.

नागपूर ः  राज्याच्या सत्तेत असलेली शिवसेना पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात मोर्चे काढत आहे. पण ही त्यांची केवळ नौटंकी आहे, या पेक्षा महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावे, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आमची सत्ता असतांना मी व अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी इंधनावरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी एल्गार परिषदेतील शरजील उस्मानी याचे वक्तव्य, त्यावर सरकारने कारवाईसाठी केलेला उशीर, संजय राऊत यांनी या विषायवर न लिहलेला अग्रलेख आणि शेतकरी आंदोलनाच्या माध्मयातून भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार असल्याकडे फडणवीसांचे लक्ष वेधण्यात आले. यावर टीक करतांना फडणवीस म्हणाले, शिवसेनेचा हा अक्षरशः ढोंगीपणा आहे, त्यांनी ही नौटंकी करण्यापेक्षा राज्य सरकारकडून इंधनावर लावलेले कर कमी केले तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील व त्याचा भुर्दंड सामन्य नागरिकांना बसणार नाही. इंधनावर व्हॅट लावण्यात आलेला आहे, त्यावर जीएसटी नाही. परंतु राज्य सरकारकडून विविध प्रकारचे कर लावण्यात आल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमंती वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा इंधनाच्या किंमती वाढतात तेव्हा त्याचा परिणाम देशात देखील होतो. अशावेळी राज्य सरकार आपले प्राॅफीट मार्जीन कमी करून इंधनाची अतिरिक्त भाववाढ रोखू शकते. राज्यात जेव्हा आमची सत्ता होती, तेव्हा मी व अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी अशा प्रकारचा निर्णय घेऊन सरकारकडून इंधनावर लावलेले कर कमी केले होते. त्यामुळे शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी न करता सरकारच्या जे हातात आहे  ते करावे, असा टोला देखील लगावला.

राऊतांचा अग्रलेख का नाही?

एल्गार परिषदेचे आयोजन कशासाठी केले जाते हे यापुर्वीच्या अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. इथे फक्त जाती-धर्मात तेढ निर्माण करणारी भाषणं केली जातात. सरकारकडे एल्गार परिषदेची सर्व माहिती आधीपासून होती, तरी देखील परवानगी देण्यात आली. हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर सरकारने चार दिवसानंतर आम्ही आवाज उठवल्यावर कारवाईसाठी पावले उचलली. त्यात देखील साधी कलमं लावण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विशेष म्हणजे राम मंदिराच्या उभारणीसाठी पैसा जनतेने द्यायचा की सरकारने यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत लेख लिहतात, पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या राऊतांना शरजील उस्मानी याच्या विधानवर लेख लिहावा वाटला नाही, याचे आश्चर्य वाटते, असा चिमटा देखील फडणवीस यांनी काढला. हिंदुत्व भाषणात सांगून चालत नाही तर ते प्रत्यक्षात जगावं लागत. हिंदुह्दयसम्राट ळासाहेब ठाकरे यांचा जेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे होतो, शिवगान ऐवजी अजान स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा आम्हाला हे बोलावं लागतं, असेही फडणवीस म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख