शिवसेना कधीच नतमस्तक होत नाही; मुख्यमंत्री शरजीलवर कारवाई करतील.. - Shiv Sena never bows down; Chief Minister will take action against Sharjeel. | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना कधीच नतमस्तक होत नाही; मुख्यमंत्री शरजीलवर कारवाई करतील..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई निश्चितच करतील. पण यावरून भाजपने आमच्यावर टिका करण्याची गरज नाही. राज्यातील सत्ता गेल्याचे दुःख त्यांना आहे, या वैफल्यातूनच ते सातत्याने शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर टिका करत असतात. पण शिवसेना कधीही कुणासमोर नतमस्तक होणार नाही.

धुळे ः भाजप सत्ता गेल्यामुळे शिवसेनेवर टिका करते आहे. सत्तेसाठी किंवा कुणासमोर शिवसेना कधीच नतमस्तक होत नाही, ही बाळासाहेबांची सेना आहे. शरजील उस्मानीचे वक्तव्य, त्याचा अर्थ आणि उद्देश तापसून त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, असे सांगतानाच शिवसेनेला कुणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला लगावला.

पुण्याच्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदूबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, ते हिंदुत्व विसरले असे म्हणत शरजीलच्या मुसक्या आवळून त्याला महाराष्ट्रात आणा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

धुळ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना भाजपच्या या टीकेबद्दल विचारले असता, तीस वर्ष शिवसेनेसोबत असलेल्या भाजपला आताच शिवसेना वाईट कशी दिसू लागली, असा सवाल केला. इतके दिवस भाजप सत्तेच्या म्हणजेच अंब्याच्या झाडाखाली होती, आता बाभळीच्या झाडाखाली आहे, त्यामुळे ते शिवसेनेवर टीका करत असल्याचा टोला लगावला.

अब्दुल सत्तार म्हणाले, शिवसेना नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर वाटचाल करणारी संघटना आहे. त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. सत्तेसाठी काय किंवा कुठल्याही कारणाने शिवसेना नतमस्तक होत नाही. एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने जे वक्तव्य केले त्याचा तपास करावा लागेल. त्याने हे वक्तव का केले? त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या का? या सगळ्या गोष्टी तपासल्याशिवाय कारवाई करता येणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई निश्चितच करतील. पण यावरून भाजपने आमच्यावर टिका करण्याची गरज नाही. राज्यातील सत्ता गेल्याचे दुःख त्यांना आहे, या वैफल्यातूनच ते सातत्याने शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर टिका करत असतात. पण शिवसेना कधीही कुणासमोर नतमस्तक होणार नाही, याचा पुनरुच्चार देखील सत्तार यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख