औरंगाबाद ः शिवसेनेचे मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. जैस्वाल यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची तपासणी करून काळजी घ्यावी, असे आवाहन देखील जैस्वाल यांनी केले आहे.
राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांनाच अचानक शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जैस्वाल यांनीच ही माहिती फेसबुकद्वारे दिली आहे. आज कोरोनाची चाचणी केली असता ती पाॅझीटीव्ह आली असून, खबरादारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात दाखल झालो असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच गेल्या काही दिवसांत जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, तसेच योग्य ती काळजी घ्यावी, लवकरच या संकटातून सुखरूप बाहेर येऊन जनतेच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास देखील जैस्वाल यांनी व्यक्त केला आहे. गेली आठ महिने प्रदीप जैस्वाल यांनी स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवले. दरम्यानच्या काळात त्यांनी गरजूंना धान्य व अन्न वाटपाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे योग्य ती काळजी घेत जैस्वाल राजकीय बैठका, कार्यक्रम मेळाव्यांना हजेरी लावत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णांची संख्या घटत असतांना अचानक जैस्वाल यांना कोरोनाने गाठले. आपली प्रकृती चांगली असून काळजीचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात देखील प्रदीप जैस्वाल उपस्थित होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य काळजी व तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महिनाभरापुर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. पंधरा दिवसात या संकटावर मात करत ते सुखरूप घरी परतले आणि पुन्हा कामाला देखील लागले. जैस्वाल हे देखील कोरोनाच्या संकटावर मात करून लवकर पुन्हा जनसेवेत परततील अशा सदिच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Edited By : Jagdish Pansare

