शेकापचा महाविकास आघाडीबद्दल रुसवा; कार्यकर्त्यांत संभ्रम - Shetkari Kamgar Pakasha leaders are avoiding participation in many initiatives of the Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

शेकापचा महाविकास आघाडीबद्दल रुसवा; कार्यकर्त्यांत संभ्रम

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

काही दिवसांपूर्वी अलिबाग येथील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील कशामुळे नाराज आहेत, असा प्रश्न विचारला होता. याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीत किंवा आघाडीच्या कार्यक्रमाला हजर राहून कोणतीही नाराजी नाही, हे देखील दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला नाही.

अलिबाग : राज्यातील महाविकास आघाडीचा शेतकरी कामगार पक्ष घटक पक्ष आहे, परंतु  महाविकास आघाडीच्या अनेक उपक्रमात शेकापचे नेतेमंडळी सहभाग घेण्याचे टाळतात. महाविकास आघाडी आणि आघाडीचे प्रमुख नेते खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल शेकापचे नेतेमंडळी कोणत्या विषयावरुन रुसवा धरुन बसले असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे.

शेकापचे नेतेही उघडपणे या विषयावर बोलण्याचे टाळतात. यामुळे राष्ट्रवादीबरोबर जवळीक कायम ठेवून आगामी निवडणुका लढवायच्या की, वेगळे राहून निवडणुका लढवायच्या याबद्दल कार्यकर्त्यांमधील गोंधळ वाढतच चालला आहे.

सध्या 84 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, त्यानंतर सहा महिन्यात दोनशेहुन  अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे. याच दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करावी लागणार आहे. यासाठी शिवसेनेने कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे.  शनिवारीच महाड येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा संपर्क मेळावा घेत पक्षाची बांधणी करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे.

तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी कोरोना कालावधीतही जिल्हा पिंजून काढत पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. खासदार सुनील तटकरे कोरोनाबाधित आढळेपर्यंत हा झंजावात सुरु होता. भाजपा देखील त्यांची बळस्थाने शोधत तेथे काम करीत आहेत. याचवेळेला सध्यस्थितीत जिल्हा परिषदेतील सर्वात जास्त सदस्य संख्या (23) असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत.

तसे पाहिले तर एकेकाळी राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणाऱ्या शेकापची ताकद रायगड जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये उरली आहे. असे असले तरी आपले अस्तित्व ठीकवण्यासाठी आघाडीच्या उपक्रमांमध्येही शेकापचे नेते दिसत नाहीत. यामुळे आगामी निवडणुकांबद्दल पक्षश्रेष्टींची कोणती भूमिका असणार, याबद्दल शेकापचे कार्यकर्ते संभ्रांवस्थेत आहेत.

काही दिवसांपूर्वी अलिबाग येथील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील कशामुळे नाराज आहेत, असा प्रश्न विचारला होता. याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीत किंवा आघाडीच्या कार्यक्रमाला हजर राहून कोणतीही नाराजी नाही, हे देखील दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला नाही.

पेण नगरपालिका प्रकरणावरुन भाजपा करीत असलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी शुक्रवारी महाविकास आघाडीचे घटक पक्षाची नेतेमंडळी जमा झाली होती. परंतु शेकापचा एकही पुढारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. यावरुन महाविकास आघाडीबद्दल शेकापची नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहेत. आगामी निवडणुकांबद्दल शेकाप पक्षीय धोरण ठरवत नसल्यानेही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख