आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच पेरे म्हणतात, माघार नाही, नव्या लोकांना संधी मिळावी हाच हेतू ..

यापुढेही माझे काम सुरूच राही, पुढील एक वर्षाच्या माझ्या तारखा बुक आहेत, राज्यभरातील गावातून मला बोलावणं येतं. त्या गावांत जाऊन मी माझे विचार आणि केलेले काम याची माहिती देतो. तुमच्या गावांतही हे कसे शक्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो, आता ज्यांना पटेल त्यांनी ते घ्यावे, नाही पटलं तर सोडून द्यावं, अशी रोखठोक भूमिका देखील पेरे यांनी मांडली.
Adarsh Village patoda story aurangabad
Adarsh Village patoda story aurangabad

औरंगाबाद ः सध्या राज्यभरात चर्चा होतेयं ती ज्या गांवाचा आदर्श राज्यभरातील ग्रामपंचायती घेतात त्या पोपटराव पवारांच्या आदर्श गांव हिवरेबाजार आणि भास्करराव पेरे यांच्या पाटोदाची. हिवरेबाजारात ३० वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे, तर पंचवीस वर्षात गावाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी यावेळी निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. नेमंक अस का घडलं याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. पाटोदा गावाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे भास्कराव पेरे पाटील आपल्या या निर्णयाला माघार मानायला तयार नाहीत, तर ते म्हणतात नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलंय बिघडलंय हे जाणून घेण्यासाठी `सरकारनामा`,ने पेरे यांनाच बोलते केले.

राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि गावागावांत स्पर्धा निर्माण झाली. गावगाड्याची सुत्रं आपल्या हाती असावी यासाठी अनेकांनी आपली शक्तीपणाला लावली.  अनेक ठिकाणी ग्रामपंचायती तर कुठे सदस्य बिनविरोध निवडूण आले. अशातच पोपटराव पवारांच्या हिवरेबाजारात निवडणूक लागली, तर राज्य आणि देशपातळीवर झळकलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा गावांचा कारभार पंचवीस वर्षानंतर नव्या लोकांच्या हाती गेला आहे. नेमकं काय घडलं, ज्यामुळे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी निवडूक अर्जच भरले नाही.

सरकारनामा प्रतिनिधीने भास्कर पेरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी माघार घेतली नाही, तर नव्या लोकांना संधी मिळावी एवढाच माझा हेतू असल्याचे सांगितले. पेरे पाटील म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कुणीही निवडणूक लढवू शकतो. गेली पंचवीस वर्ष  मी पाटोदा ग्रामपंचायतीत काम करतो आहे. पैकी दहा वर्ष सरपंच म्हणून तर पंधरा वर्ष सदस्य म्हणून.

या संपुर्ण काळात गावाचा विकास आणि गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पोहचवून त्यांचे राहनीमान चांगले कसे होईल यासाठी प्रयत्न केले. हे मी गावावर किंवा लोकांवर उपकार केले नाहीत, तर त्यांनी मला निवडूण देत माझ्यावर ती जबाबदारीच टाकली होती. ती फक्त मी पार पाडली. ती देखील त्यांच्याकडून कराच्या रूपात वसुल केलेलल्या  पैशातून. लोकशाही मध्ये कोणीही कायमस्वरूपी खुर्ची किंवा सत्तेवर राहत नाही. बदल घडत असतात, नवे लोक समोर येत असतात हे बदल स्वीकारात नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे असं माणनारा मी आहे.

मी निवडणूक लढवत नाहीये, यात वेगळं काय आहे? याची एवढी चर्चा कशासाठी? हेच मला समजत नाही. इतकी वर्ष गावासाठी मी जे काम केलं, त्याही पेक्षा चांगले काम करण्याची इच्छा बाळगून जर कुणी पुढे येत असेल तर माझ्या सारख्या माणसाने थांबल पाहिजे. किती वर्ष एकाच व्यक्तीने सरपंच किंवा सदस्य म्हणून रहावं, हा विचार करूनच मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या या निर्णयांनतर गेली अनेक वर्ष माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी देखील तोच निर्णय घेतला आणि आम्ही कुणीच निवडणूकीचा अर्ज भरला नाही.

काही लाेक याला माघार म्हणतात, पण मी याला माघार मानत नाही, कारण माझा या निर्णयमागचा हेतू शुद्ध आहे. नव्या लोकांनी आणखी चांगल्या पद्धतीने काम करावे, आहे ते काम नेटाने पुढे नेऊन त्यात २५ टक्के जरी वाढ झाली तर हा बदल सार्थकी लागला असे मला वाटेल. शेवटी मी गावांतच राहणार आहे, जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी निवडणूक लढवली नाही याचा एवढा बाऊ आणि चर्चा होण्याची गरज नाही, असेही पेरे पाटील म्हणाले.

लोकांची दिशाभूल करू नका..

मोफत पिठाची गिरणी, गावातील लोकाना चार प्रकारचे पाणी, रोज गरम पाणी, सौर उर्जा, शौचालये, अंगणवाडी, मोफत वायफाय, अर्ध्या किंमतीत ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांचे शेत नांगरून देण्याची योजना, ३६ निराधारांचा ग्रामपंचायतीकडून होत असलेला सांभाळ, दिव्यांगाना वर्षाला चार हजारांची मदत, २० रुपये किलोने प्रत्येक कुटुंबाला साखर असे अनेक निर्णय माझ्या काळात घेतले.

आज राज्य आणि देशपातळीवर पाटोदा गावाची जी ओळख निर्माण झाली ती गावकऱ्यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावरच झाली. राज्य आणि केंद्र पातळीवर गावाला २५ हून अधिक पुरस्कार मिळाले हे माझ्या एकट्याचे काम नाही. जे करता येईल, शक्य आहे, त्याच गोष्टी मी सांगितल्या. शंभर टक्के कर वसुली होत असल्याने त्या पैशाचा पुरेपूर मोबदला सोयी-सुविधांच्या माध्यमातून लोकांना मिळाल्या पाहिजे, हा निर्धार करूनच काम करत गेलो.

अमुक माफ करू, पाणीपट्टी माफ करू अशा लोकांच्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना आम्ही थारा दिला नाही, यापुढेही कोणी देऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. नव्या लोकांना संधी मिळाली आहे. अकरा पैकी ८ सदस्य बिनविरोध निवडूण आले आहेत, तीन सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. यात माझी मुलगी देखील आहे. पण बहुमता इतके सदस्य बिनविरोध आल्यामुळे आता फक्त औपचारिकता शिल्लक राहीली आहे. नव्या सदस्यांनी पाटोद्याचे नाव माझ्यापेक्षाही चांगले काम करून आणखी पुढे न्यावे, एवढीच माझी अपेक्षा असल्याचेही पेरे पाटील म्हणाले.

यापुढेही माझे काम सुरूच राही, पुढील एक वर्षाच्या माझ्या तारखा बुक आहेत, राज्यभरातील गावातून मला बोलावणं येतं. त्या गावांत जाऊन मी माझे विचार आणि केलेले काम याची माहिती देतो. तुमच्या गावांतही हे कसे शक्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो, आता ज्यांना पटेल त्यांनी ते घ्यावे, नाही पटलं तर सोडून द्यावं, अशी रोखठोक भूमिका देखील पेरे यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com