वाळू तस्कर व महसुल-पोलीस प्रशासनाच्या मिलीभगत विरोधात भाजप आमदाराचे उपोषण - Sand smuggling, illegal excavation and revenue- BJP MLAs go on hunger strike against collusion of police administration | Politics Marathi News - Sarkarnama

वाळू तस्कर व महसुल-पोलीस प्रशासनाच्या मिलीभगत विरोधात भाजप आमदाराचे उपोषण

वैजीनाथ जाधव
मंगळवार, 19 जानेवारी 2021

या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तरी प्रशासनाने कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आलेले नाही.  त्यामुळे गोदा पट्ट्यातून होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, वाळू तस्करी करणाऱ्यावर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून त्याचे दर कमी करण्यात यावेत, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

गेवराई ः तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. संबंधित वाळू तस्कर महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गोदापात्रात वाळूचे उत्खलन करत आहेत.  या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले, पंरतु कुठलीच कारवाई होत नसल्याने भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आज आमरण उपोषण सुरू केले.  वाळु लिलाव तात्काळ करावा यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी गोदापट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीबाबत लक्षण पवार यांनी १३ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या बाबत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला निवदेन देत अनेक विषयांना वाचा फोडली.

४ जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने चिरडले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने गोदा पट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तरी प्रशासनाने कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आलेले नाही.  त्यामुळे गोदा पट्ट्यातून होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, वाळू तस्करी करणाऱ्यावर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून त्याचे दर कमी करण्यात यावेत, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.  इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे सहा वर्षात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राईस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत त्यामुळे ही अपसेट प्राइस कमी करावी.

जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणाऱ्या वर धाडी टाकाव्यात, वाळू तस्करांना रात्री-अपरात्री मोबाईल द्वारे अपडेट माहिती देणाऱ्या महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल संभाषण तपासून दोषींवर कारवाई करावी, गंगावाडी प्रकरणात तलाठी निलंबित करण्यात आला आहे, मात्र पोलीस अमलदार यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे देखील आमदार पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गेवराई मतदार संघात असलेल्या गोदावरी सिंदफना नदी पट्ट्यातील वाळू वाहतूक व उत्कलन बाबत असलेले नियम अपसेट प्राईस संदर्भात तातडीने मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक घेण्यात यावी, याकडे देखील पवार यांनी लक्ष वेधले. तसेच या मागण्यांसाठी आमरण उपोषणही सुरू केले. 

यावेळी जि.प.सदस्य पांडुरंग थडगे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, भाजपा किसान आघाडीचे देविदास फलके,जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, प्रा.शाम कुंड, अरुण चाळक यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख