तीच क्रेझ, तोच कामाचा धडाका; धनंजय मुंडेंच्या जनता दरबाराला गर्दी.. - The same craze, the same work ethic; Crowd at Dhananjay Munde's Janata Darbar | Politics Marathi News - Sarkarnama

 तीच क्रेझ, तोच कामाचा धडाका; धनंजय मुंडेंच्या जनता दरबाराला गर्दी..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

साधारण पावणे तीनच्या सुमारास सुरू झालेल्या जनता दरबारात लोकांचा गराडा, याला फोन लाव, त्याला फोन लाव, याचे पत्र द्या, अशी लगबग सुरू होती. त्यातच एक वयोवृद्ध आजोबा आपल्या जमिनीच्या मोजमापाच्या संदर्भातील तक्रार घेऊन आले.  इतक्या गर्दीतही मुंडेंनी त्या आजोबांना नावाने हाक मारली. यामुळे आजोबांना सुखद धक्का बसला आणि ते भारावून गेले. 

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची क्रेझ आणि कामाचा धडाका कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. बीड येथील जनता दरबारात आपली कामे, तक्रारी आणि गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदविस वाढतच आहे. शेवटच्या माणसाचे काम होईपर्यंत जाणार नाही, असे सांगत मुंडे यांनी देखील आपले प्राधान्य लोकांच्या कामालाच असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जनता दरबार मुंबई, परळी पाठोपाठ आता बीडमध्येही भरवण्यात येत आहे. यापुढे दर महिन्याला किमान एकदा जनता दरबार आयोजित करून सामान्य नागरिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुंडे सांगतात.

सामान्य माणसाचे जनता दरबाराच्या माध्यमातून समाधान करणे, आपले काम होईल या अपेक्षेने आलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्यच  असल्याची भावना देखील मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली. 

बीड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून लोक आपले प्रश्न, निवेदने घेऊन भेटण्यासाठी जनता दरबारात आले होते. तीन तास चाललेल्या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. या प्रश्नानांचा जागेवरच निपटारा व  शंकेचे समाधानही मुंडेकडून करण्यात येत होते.  यावेळी मुंडे यांच्यासह, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार सय्यद सलीम, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते. 

आजोबांचे कामही झाले फत्ते..

साधारण पावणे तीनच्या सुमारास सुरू झालेल्या जनता दरबारात लोकांचा गराडा, याला फोन लाव, त्याला फोन लाव, याचे पत्र द्या, अशी लगबग सुरू होती. त्यातच एक वयोवृद्ध आजोबा आपल्या जमिनीच्या मोजमापाच्या संदर्भातील तक्रार घेऊन आले.  इतक्या गर्दीतही मुंडेंनी त्या आजोबांना नावाने हाक मारली. यामुळे आजोबांना सुखद धक्का बसला आणि ते भारावून गेले. 

मुंडेनी तातडीने आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत आजोबांच्या कामासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या जमीनीच्या मोजणीचा प्रश्न मार्गी लावला.आजोबांनी धनंजय मुंडे यांना आशीर्वाद म्हणून पुस्तक भेट दिली व चेहऱ्यावर समाधान घेऊन गेले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख