महापालिका निवडणुकीत संभाजीनगरकरच तुम्हाला `नमस्ते` करतील; भाजपला शिवसेनेचा टोला - Sambhajinagar will Namste you in the municipal elections, syas Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

महापालिका निवडणुकीत संभाजीनगरकरच तुम्हाला `नमस्ते` करतील; भाजपला शिवसेनेचा टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 जानेवारी 2021

या शहराची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधकांना संभाजीगरकरच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नमस्ते करतील असे म्हणत टोला लगावला. निवडणूका येतील जातील, पण संघर्ष, जनतेची कामे,समाजसेवा ही कामे कदापी थांबणार नाही.  त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतो आणि राहील.

औरंगाबाद ः काही लोक हेतूपुरस्पर या ऐतिहासिक शहराचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत  वेगवेगळ्या विषयामुळे त्यांचा ढोंगीपणा, खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. विरोधकांना आता संभाजीनगरकरच नमस्ते करतील, असा टोला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनीच भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या नमस्ते संभाजीनगरचे फलक काढण्यात आले होते. त्यानंतर भाजपने निषेधार्थ आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला हा टोला लगावला.

औंरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा, अशी मागणी काॅंग्रेस वगळता सगळ्याच प्रमुख पक्षांनी लावून धरली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांपासून सगळेच नेते संभाजीनगरसाठी आग्रही असून ते होणारच असा ठाम दावा ते करत आहेत. शनिवारी औरंगाबादेत पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील संभाजीनगर होणारच असा विश्वास आपल्या भाषणांतून व्यक्त केला.

नावावरून सुरू असलेल्या या राजकारणात भाजपने शहरात नमस्ते संभाजीनगर असे फलक लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या सुपर संभाजीनगरला नमस्ते संभाजीनगरने प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण पोलीसांनी परवानगी नसल्याचे कारण देत हे फलक हटवले आणि भाजप संतापली. इकडे आदित्य ठाकरे, सुभाष देसाई शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्धाटन करत असतांना दुसरीकडे टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर भाजपच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत होता.

भाजपच्या या अपशकुनाला आणि नमस्ते संभाजीनगरला शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आज प्रत्युत्तर दिले.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलतांना दानवे म्हणाले, या शहराची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधकांना संभाजीगरकरच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नमस्ते करतील असे म्हणत टोला लगावला. निवडणूका येतील जातील, पण संघर्ष, जनतेची कामे,समाजसेवा ही कामे कदापी थांबणार नाही.  त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतो आणि राहील.

पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी गुंठेवारी चा प्रश्न मार्गी लावलाअसून गुंठेवारी भागातील शिवसेनेच्या प्रत्येक शाखेने शिवसेना गुंठेवारी मदत केंद्र सुरू करावे. जेणेकरून नागरिकांच्या गुंठेवारीतील मालमत्तांचे प्रश्न सुटतील. २३ जानेवारी रोजी हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  आठवडाभर विविध उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात प्रत्येक वार्डात जयंती साजरी करावी असे आवाहन आमदार दानवे यांनी यावेळी केले. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख