संभाजीनगरची फक्त चर्चा घडवून आणू नये, निर्णय घ्यायला सरकारला कुणी अडवले? - Sambhajinagar cannot be a political issue; The government should decide | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीनगरची फक्त चर्चा घडवून आणू नये, निर्णय घ्यायला सरकारला कुणी अडवले?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

शिवसेना हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, यासाठी आम्ही ४५ आंदोलन केली, गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही यासाठी लढा देत असल्याचे सांगते. आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही, जोपर्यंत संभाजीनगर होत नाही तोपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवू , अशी भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे.

औरंगाबाद ः औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा विषय हेतूपुरस्पर प्रसार माध्यमांमध्ये चर्चेला आणला जातोय. राज्यकर्त्यांनी या बाबात निर्णय घेतला पाहिजे, त्यावर राजकारण करता कामा नये. संभाजीनगर हा विषय राजकारणाचा होऊच शकत नाही, असे मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. निवडणुका आल्या की हा विषय पुढे आणला जातो, असा आरोप देखील त्यांनी केला.

गोपीचंद पडळकर हे आपल्या नियोजित दौऱ्यावर जाण्याआधी जालना येथे काही वेळासाठी थांबले होते. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी त्यांना संभाजीनगरच्या विषयाबद्दल प्रतिक्रिया विचारली. यावर बोलतांना त्यांनी हा विषय निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम राज्यकर्त्यांकडून चर्चेत आणला जातो. त्यावर फक्त चर्चा घडवून आणणे एवढाच सरकारचा हेतू दिसतो,  असा आरोपही पडळकरांनी केला.

संभाजीनगरचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेषतः कुठल्याही निवडणुका आल्या की हा विषय राज्यकर्त्यांकडून पुढे केला जातो. औरंगाबादचे संभाजीनगर करायला तुम्हाल कुणी आडवले आहे. तुमच्या हातात सत्ता आहे, तेव्हा चर्चा घडवून आणण्यापेक्षा थेट निर्णय घ्या ना, असा सल्ला देखील पडळकर यांनी सरकारला दिला.

संभाजीनगर हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, त्यावर कुणी घाणेरडे राजकारण करू नये. पण दुर्दैवाने या विषयाचे गेली अनेक वर्ष राजकारण केले गेले, ते अगदी चुकीचे आहे. सरकारने या संदर्भात आता थेट निर्णय घेऊन टाकावा, असेही पडळकर म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करा अशी मागणी शिवसेना, भाजप, मनसेने लावून धरली आहे. शिवसेना हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, यासाठी आम्ही ४५ आंदोलन केली, गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही यासाठी लढा देत असल्याचे सांगते. आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही, जोपर्यंत संभाजीनगर होत नाही तोपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवू , अशी भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे.

तर मनसेने देखील या वादात उडी घेत सरकारला २६ जानेवारीपर्यंत संभाजीनगर करा, नाही तर.. असे म्हणत अल्टीमेटम दिला होता. पण तीन दिवस उलटून गेल्यानंतरही मनसेकडून या मागणीवरून कुठलीच हालचाल होतांना दिसत नाहीये.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख