आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतीवर भगवा, सर्व सदस्यांनी घेतली आमदार दानवेंची भेट.. - Saffron at Adarsh Gaon Patoda Gram Panchayat, all members met MLA Danve | Politics Marathi News - Sarkarnama

आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतीवर भगवा, सर्व सदस्यांनी घेतली आमदार दानवेंची भेट..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

आदर्श गांव पाटोदा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडूण आलेले सर्व ११ सदस्य हे शिवसैनिकच असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित  ग्रामपंचायत सदस्यांचा अंबादास दानवे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आज सत्कार करत अभिनंदनही केले.

औरंगाबाद ः संपुर्ण राज्यात गाजलेल्या आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. निवडणुकीआधी बिनविरोध आलेले ८ व ३ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर विजयी झालेले असे सर्व ११ नवे सदस्य आता या गावचा कारभार पाहणार आहेत. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची भेट घेतली. हे सर्व सदस्य शिवसैनिकच असून पाटोदा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला असल्याचे अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.

राज्यातील साडेचौदा हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यभरात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतीची चर्चा होती. हिवरेबाजारात कित्येक वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडीत झाल्यामुळे तर आदर्श गांव पाटोदा येथे भास्कर पेरे पाटील यांच्या विरोधात गावातील तरूणांनी दंड थोपटल्यामुळे. देश व राज्य पातळीवर भास्कर पेरे पाटील यांनी पाटोदा गावाला ओळख आणि अनेक पुरस्कार मिळवून दिलेले असतांना गाव त्यांच्या विरोधात का गेले? याची चर्चा राज्यभरात सुरू होती.

गावात विरोध होत असल्याचे पाहताच पेरे व त्यांच्या समर्थक सदस्यांनी निवडणूकच लढवायची नाही असा पावित्रा घेतला आणि विरोधी पॅनलचे आठ सदस्य बिनविरोध निवडूण आले. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणुक झाली, यात पेरे पाटील यांची कन्या अनुराधा हिचा देखील पराभव झाला. त्यामुळे या निकालानंतर देखील पोटाद्याची चर्चा राज्यभरात झाली. 

विशेष म्हणजे आदर्श गांव पाटोदा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडूण आलेले सर्व ११ सदस्य हे शिवसैनिकच असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित  ग्रामपंचायत सदस्यांचा अंबादास दानवे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आज सत्कार करत अभिनंदनही केले.

आदर्श गाव पाटोदयात ११ पैकी ११ शिवसेनेचे सदस्य निवडून आले असून यात कपिंद्र पेरे, पुष्पा सोमीनाथ पेरे ,सुनिता कृष्णा पेरे, बब्बाभाई कैलास पेरे, पुनम गाडेकर, मिरा जाधव, शामल थटवले ,लक्ष्मण मातकर, छाया पवार, जयश्री दिवेकर, मंदा खोकड यांचा समावेश आहे. अंबादास दानवे  यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आदर्श असलेल्या पाटोदा गावाची परंपरा कायम ठेवावी, समाजाच्या व जनतेचे कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख