औरंगाबादेत शंभर कोटी रुपयांचा जमीन घोटाळा; इम्तियाज जलील यांचा दावा - Rs 100 crore land scam in Aurangabad; Imtiaz Jalil claims | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादेत शंभर कोटी रुपयांचा जमीन घोटाळा; इम्तियाज जलील यांचा दावा

जगदीश पानसरे
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

इम्तियाज जलील यांनी अगदी आमदार असतांनापासून महापालिकेतील भ्रष्टाचारावर वेळोवेळी जाहीर भूमिका घेत आरोप केले होते. रस्त्याची कामे असतील, कचऱ्याचे कंत्राट असेल किंवा बांधकाम विभागाशी संबंधित विषय असेल, या संदर्भात इम्तियाज जलील यांनी कठोर टीका केल्याचे पहायला मिळाले. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या लक्षवेधी प्रश्नावरून देखील गंभीर आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती.

औरंगाबाद ः महापालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी व शहरातील मोठे व्यापारी, बिल्डर, भुमाफियांनी मिळून शंभर कोटींहून अधिकचा जमीन घोटाळा केल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले असून आपण हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार आहोत, असे देखील म्हटले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी अगदी आमदार असतांनापासून महापालिकेतील भ्रष्टाचारावर वेळोवेळी जाहीर भूमिका घेत आरोप केले होते. रस्त्याची कामे असतील, कचऱ्याचे कंत्राट असेल किंवा बांधकाम विभागाशी संबंधित विषय असेल, या संदर्भात इम्तियाज जलील यांनी कठोर टीका केल्याचे पहायला मिळाले. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या लक्षवेधी प्रश्नावरून देखील गंभीर आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती.

आता औरंगाबादेत शंभर कोटीहून अधिकचा घोटाळा झाल्याचा दावा करतांनाच यामध्ये महापालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी गुंतलेले असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. इम्तियाज जलील म्हणतात, उद्या मी शहरातील शंभर कोटींपेक्षा जास्तचा घोटाळा उघडकीस आणणार आहे. यात महापालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालय, बिल्डर, व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

सर्व पुराव्यानिशी आपण हे प्रकरण पोलीसांना चौकशीसाठी देणार आहोत. फक्त पोलीसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता याची कसून, सखोल चौकशी केली. तर निश्चितच हे भूमाफिया तुरूंगात जातील, असा विश्वास मला आहे, असेही इम्तियाज जलील यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

विशेष म्हणजे आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. देशभरात शेतकरी आंदोलन, कृषी सुधारणा कायद्यावरून गदारोळ सुरू आहे. अशातच इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतील शंभर कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्याचा दावा करत तसे जाहीर केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख