आढावा बैठक, जलकुंभाच्या कामाची पाहणी; मुख्यमंत्र्यांचा दौरा तासाभरात आटोपला.. - Review meeting, inspection of water tank work; The Chief Minister's visit ended in an hour. | Politics Marathi News - Sarkarnama

आढावा बैठक, जलकुंभाच्या कामाची पाहणी; मुख्यमंत्र्यांचा दौरा तासाभरात आटोपला..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्री लोणार-औरंगाबाद दौऱ्यावर येण्यापुर्वीच त्यांचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यात प्रामुख्याने जिल्हा क्रिडा संकुलाचे भुमीपूजन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आढावा बैठक आणि जलकुंभाच्या कामाची पाहणी अशा थोडक्यात कार्यक्रम करण्याचे ठरले.

औरंगाबाद ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यात काही घोषणा करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांचा हा दौरा अवघ्या तासाभराचा म्हणजेच औटघटकेचा ठरला. यातील नियोजित कार्यक्रम देखील ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सगळ्यांचाच हिरमोड झाला. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाची पाहणी , मनपा प्रशासकांच्या बंगल्यातील दहा मिनिटांचा पाहुणाचार व जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न मनसेने औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी करत काल केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रके भिरकावत, मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा देखील मनसेने इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली होती. भाजपकडून देखील असाच प्रयत्न झाला पण पोलीसांनी शहराध्यक्ष केनेकर यांना अटक करत तो देखील हाणून पाडला.

मुळात मुख्यमंत्र्यांचा प्रमुख दौरा हा लोणार सरोवराला भेट आणि पाहणी हाच होता. पण औरंगाबादहून हेलीकाॅप्टरने ते लोणारला जाणार असल्यामुळे परततांना त्यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुलाचे उद्घाटन, आढावा बैठक, जलकुंभाच्या कामाचे भुमीपूजन आदी कार्यक्रमांचीी देखील आखणी करण्यात आली होती. दीड महिन्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शहरात येणार असल्याने शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण देखील होते.

पण मुख्यमंत्री लोणार-औरंगाबाद दौऱ्यावर येण्यापुर्वीच त्यांचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यात प्रामुख्याने जिल्हा क्रिडा संकुलाचे भुमीपूजन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आढावा बैठक आणि जलकुंभाच्या कामाची पाहणी असा थोडक्यात कार्यक्रम करण्याचे ठरले. त्यानूसार लोणार सरोवराची पाहणी करून साधरणात दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री चिकलठाणा विमानतळावर आले.

त्यानंतर थेट दिल्लागेट येथील जलकुंभाच्या कामाची पाहणी करून मुख्यमंत्री शेजारीच असलेल्या महापालिका प्रशासक आस्तीककुमार पांडेय यांच्या बंगल्यावर गेले. तिथे अवघ्या दहा मिनिटांत चहापान घेऊन ते  जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तिथे मानवंदना स्वीकारल्यानंतर अर्ध्या तासात त्यांनी जिल्ह्यातील सिंचन,शेती, शेतकरी कर्जमाफी, रस्ते आणि महापालिकेच्या कामाचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना रखडलेल्या कामांना गती द्या, निधीचे मी बघतो अशा सूचना देत एक वाजता शहरात दाखल झालेले मुख्यमंत्र्यांचे हेलीकाॅप्टर अडीच वाजता मुंबईच्या दिशेने उडाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी हा दौरा आटोपता घेतल्याची देखील चर्चा या निमित्ताने कार्यक्रमस्थळी होती.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख