सावंतांच्या विरोधाला राजेनिंबाळकरांकडून चोवीस तासात प्रत्युत्तर; मोटेंसोबत लावली हजेरी

सावंत यांचे राजकीय विरोधक राहुल मोटे व ओमराजे एकाच व्यासपीठावर दिसले. एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी हजेरी लावणे हा निव्वळ योगायोग नव्हता.हा त्यांच्या राजकीय खेळीचाच भाग असल्याचे बोलले जाते, आजवर राहुल मोटे व खासदार राजेनिंबाळकर यांच्यामध्ये संवाद होता, पण त्याला एकप्रकारची मर्यादा होती.
Rajenimabalkar- Mote Meeting news Osmanabad
Rajenimabalkar- Mote Meeting news Osmanabad

उस्मानाबाद ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रा.तानाजी सावंत हे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वपक्षातील खासदार व आमदार यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सावंत यानी केला होता. दुसऱ्याच दिवशी माजी आमदार राहुल मोटे व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. मोटे व राजेनिंबाळकर यानी टाईमिंग साधत सावंत यांना तात्काळ सूचक इशारा दिल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खासदार राजेनिंबाळकर व प्रा. सावंत यांच्यामध्ये अत्यंत सलोख्याचे संबध राहिलेले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी सावंत यानी थेट राजेनिंबाळकर यांचे शत्रु राणाजगजितसिंह पाटील यांना साथ देत सत्ता हस्तगत केली. यावेळी माजी आमदार मोटे यांच्याशी जुळवुन घेणार नाही, हेच सावंत यांनी स्पष्ट केले होते.  त्याचवेळी खासदार राजेनिंबाळकर यांच्या हातात येणारी जिल्हा परिषद फक्त सावंत यांच्यामुळे पुन्हा राणा पाटील यांच्याकडे गेली.

यामुळे दोघांमध्ये काही प्रमाणात अंतर पडल्याचे दिसुन आले होते. पण जाहीरपणे ते दिसलेले नव्हते. मात्र २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत  सावंत यांनी खासदार राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. यामुळे राजेनिंबाळकर व्यथित होते, पण दुसऱ्याच दिवशी सावंत यांचे राजकीय विरोधक राहुल मोटे व ओमराजे एकाच व्यासपीठावर दिसले. एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी हजेरी लावणे हा निव्वळ योगायोग नव्हता.हा त्यांच्या राजकीय खेळीचाच भाग असल्याचे बोलले जाते, आजवर राहुल मोटे व खासदार राजेनिंबाळकर यांच्यामध्ये संवाद होता, पण त्याला एकप्रकारची मर्यादा होती. या दोघात नातेसंबध असतानाही राजकीय सबंधात मात्र गोडवा दिसुन आलेला नव्हता. 

दोघांची परिस्थिती सारखीच.. 

प्रा.सावंत व राहुल मोटे हे राजकीय विरोधक तसेच आमदार राणा पाटील व खासदार ओमराजे यांच्यातील संघर्ष तर सर्वश्रुत आहे. मोटे व आमदार पाटील यांच्यामध्ये अत्यंत घरोब्याचे सबंध, मात्र आता सावंताशी केलेली जवळीक मोटे यांनाही खटकली असेल. त्यामुळे सध्यस्थितीला खासदार ओमराजे व राहुल मोटे याची परिस्थिती सारखीच झाल्याचे दिसुन येत आहे. या दोघांची जवळीक जिल्ह्याच्या राजकारणातील बदलाची ही नांदी आहे का? हे लवकरच स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com