परभणी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या नाड्या भाजप बंडखोरांच्या हातात - The pulse of Parbhani District Bank chairmanship is in the hands of BJP rebels | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

परभणी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या नाड्या भाजप बंडखोरांच्या हातात

गणेश पांडे
मंगळवार, 23 मार्च 2021

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीची प्रक्रिया संपली असली तरी आता खऱ्या राजकीय खेळाला सुरुवात होणार आहे.

परभणी ः जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्वपूर्ण असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालकपदाची निवडणुक अटीतटीची झाली. या निवडणुकीत काॅंग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटाला १० तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या. त्यामुळे एक अपक्ष आणि एक वरपुडकर गटाकडून बिनविरोध आलेल्या दोन संचालकांच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोन संचालक आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतात यावर बोर्डीकर-वरपुडकरांची भिस्त असणार आहे.

जिल्हा बॅंकेचा निकाल हाती आला असला तरी तो कुणाच्या एकाच्या बाजूने नाही हे स्पष्ट झाले आहे. २१ संचालकांपैकी १० काॅंग्रेस आमदार सुरेश वरपुडकर गटाला तर ९ जागा बोर्डीकरांच्या पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच होणार हे मात्र निश्चित. स्वतंत्रपणे निवडणुक लढविलेले भाजप गणेश रोकडे व बालाजी देसाई हे खरे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीची प्रक्रिया संपली असली तरी आता खऱ्या राजकीय खेळाला सुरुवात होणार आहे. कारण वरपुडकर गटाकडे असलेले १०, बोर्डीकर गटाकडे असलेले ९ सदस्य व दोन सदस्यांच्या बाबत असलेला संभ्रम यामुळे अध्यक्षपदासाठी बोर्डीकर, वरपुडकर गटात काॅंटे की टक्कर होणार आहे. अध्यक्ष निवडीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी आजपासून त्या दृष्टीने जिल्हा बॅकेच्या राजकीय पटलावर वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जाणार आहेत. 

मुळचे भाजपचे असलेले गणेश रोकडे यांनी स्वतंत्र निवडणुक लढविल्याने ते कुणाच्या पाठीशी जातात या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. तर नुकतेच भाजप मध्ये आलेले पंरतू जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत वरपुडकर गटाचे काम करणारे बालाजी देसाई यांच्या बद्दल देखील संभ्रम निर्माण झाला आहे. हे दोन संचालक कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात यावर अध्यक्षपद कोणत्या गटाकडे जाते हे अवलंबून आहे.

 

दुर्राणीचा प्रभाव जाणवला नाही..

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे बोर्डीकर गटात सामील झाल्यामुळे रंगत आली होती. वरपुडकरांनी खऱ्या शेतकऱ्यांना डावलून शहरी उमदेवार दिल्याचा आरोप करत दुर्राणी यांनी बोर्डीकर गटात उडी घेतली होती. याचा चांगला फायदा बोर्डीकरांना होईल असे वाटत होते. परंतु स्वःत दुर्राणी आणि त्यांचे अन्य एक समर्थक दत्तात्रय मायदंळे हे दोघेच निवडून आले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोर्डीकर गटाला पुन्हा आपली शक्तीपणाला लावावी लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख