परभणी ः उन्हाळ्यात पक्षांची अन्न व पाण्यासाठीची भटंकती थांबविण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. येत्या उन्ह्याळात जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहत्या घरी, शेतात, मुळगावी पक्षांसाठी अन्न व पाणी ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेने पारित केले आहेत.
पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते. पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा विचार पुढे आला आणि त्या संदर्भात जिल्हा परिषदेने तातडीने निर्णय घेत तसे आदेशही काढलेत.
आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे, झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्या वन्य प्राण्याना जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
“पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे सांगत परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी - कर्मचाऱ्यांना तसे आदेशच मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिले आहेत.
अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुळगावी, तसेच सद्या रहात असलेल्या ठिकाणी, स्वताच्या शेतात, घरा समोर, घराच्या छतावर पक्ष्यांना आणि प्राण्यांना जमिनीवर पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी दाने व खाद्य नियमित ठेवण्याचे लेखी आदेशच त्यांनी दिले आहेत.
छायाचित्रही सादर करावी लागणार
ज्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रहात्या घरी पक्षांसाठी सोय केली आहे. त्यांची छायाचित्रे काढून ती जिल्हा परिषदेकडे सादर करावी लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांना जबाबदारी देण्यात आली आहे.
जागतिक उष्णतामानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदल, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष,अतिवृष्टी, पुर इत्यादी नैसर्गीक आपत्तीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे लोकचळवळीत रुपांतर होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती, कुंटूब यांचा सहभाग अतिशय महत्वपूर्ण, असल्याचे मत या निमित्ताने शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केले.
Edited By : Jagdish Pansare

