नांदेड ः पण गेली पाच वर्ष भाजपची सत्ता असतांना मराठवाड्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले, हा भाग उपेक्षित राहिला. काहीच काम झाली नाही. मी मंत्री झाल्यानंतर लोक मला विचारू लागली तेव्हा मी म्हणाले, मी आताच मंत्री झालो आहे, आधीच्या लोकांना कधी तुम्ही विचारले का? पण आता काळजी करू नका, सुदैवाने सार्वजिक बांधकाम खाते माझ्याकडे आहे. त्यामुळे नांदेडला काहीही कमी पडू देणार नाही, नांदेड चकाचक करून टाकतो, असा विश्वास सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना दिला.
चार-पाच कोटींच्या कामासाठी आता कुणीही टाळी देत नाही, आमच्या विकासाची भूक आता हजार कोटींची झाली आहे, असे सांगत मराठवाड्यातील उपेक्षित जिल्ह्यांचा विकास येत्या काळात निश्चित करणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मला चांगले सहकार्य मिळत असल्याचेही चव्हाण म्हणाले.
नांदेड-अर्धापूर दरम्यान आसना नदीवरील पुलाच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामाचे भुमीपूजन अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यात होणारी विकासकामे याची माहिती उपस्थितांना दिली. तळ राखी तो पाणी चाखी, या प्रमाणे निश्चितच मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्याला माझे झुकते माप राहणार आहे. पाच वर्षात रखडलेली विकास कामे वेगाने पुर्ण करून येथील विकासाला चालना देणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले पण कोरोना या जागतिक महामारीमुळे विकासकामांना ब्रेक लागला. राज्याच्या तिजोरीतील महसुल घटला जिथे शंभर रुपये यायचे तिथे फक्त तीस रुपये येऊ लागले. ते देखील कोरोनाचा मुकाबला करण्यावर खर्च करावे लागले. कोरोनाचे संकट दूर झाले तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका, त्याची आचारसंहिता लागली त्यामुळे कामे करता आली नाही.आता कामाला सुरूवात करतो आहोत, तर नगर पंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पण आता आपण थांबणार नाही.
मंत्रालयातून जेव्हा विकासकामांच्या फायली मुख्यमंत्र्यांकडे जातात तेव्हा त्यात नांदेडची फाईल आहे का? याकडे माझे बारकाईने लक्ष असते, नांदेडची फाईल असेल तरच सही करतो असे मी अधिकाऱ्यांना सांगतो. गंमतीचा भाग जाऊ द्या, पण आता नांदेड जिल्ह्याचा विकास झपाट्याने केल्याशिवाय मी थांबणार नाही, अशी ग्वाही देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
नांदेडसाठी २७५५ कोटी दिले..
गेल्या पाच वर्षात नांदेड आणि मराठवाड्याचा विकास रखडल्याचा पुनरुल्लेख करतांनाच आता जिल्ह्यातील ८० रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी तब्बल २७५५ कोटी तर ४० इमारतींच्या कामांसाठी १५० कोटींचा निधी दिल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. हे कुठे बाहेर सांगू नका नाही तर सगळा निधी नांदेडलाच दिला असे म्हणतील, अशी मिश्किल टिप्पणी देखील चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो, जेव्हा केव्हा मी त्यांच्याकडे निधी मागितला, तेव्हा त्यांनी मला नाही म्हटले नाही. प्रत्येक कामासाठी निधी दिला, उपमुख्यमंत्र्यांचे देखील मी आभार मानतो.
नांदेड- अर्धापूर दरम्यान आसना नदीवरील हा पूल खूप खबरा झाला. कोकणात जेव्हा पुलावरून बस नदीत कोसळून अनेकांचे प्राण गेले तेव्हा लोकांनी घाबरून मला आसना नदीवरील पुल कधी करणार असे विचारले होते. पण तेव्हा आपले सरकार नव्हते. तेव्हाच्या मंत्र्यांनी तर ढुंकूनही पाहिले नाही, जे जिल्ह्यात देखील आले नाही. पण दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, हे काम माझ्या हातून व्हायचे होते म्हणून आज या पुलाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्ती नाही तर ३० कोटी रुपये खर्चून नवा पूल आपण येत्या सहा महिन्यात उभारणार आहोत,अशी घोषणा देखील चव्हाण यांनी केली.
Edited By : Jagdish Pansare

