निलंगेकरांनी केलेल्या फिक्सींगच्या आरोपावर शिवसेना, भाजप नेत्यांचे नो काॅमेंटस.. - No comments from Shiv Sena and BJP leaders on the allegation of fixing Nilangekar. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

निलंगेकरांनी केलेल्या फिक्सींगच्या आरोपावर शिवसेना, भाजप नेत्यांचे नो काॅमेंटस..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

केंद्र सरकार, दिल्लीतील शेतकरी आंदोलन यावर भरभरून बोलणाऱ्या संजय राऊत यांना जेव्हा लातूरमधील शिवसेनेच्या फिक्सींग व त्यावरील आरोपाबद्दल विचारले तेव्हा, वो रहेने दो, म्हणत त्यावर बोलणे टाळले. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील हात झटकत निलंगेकरांच्या आरोपाबद्दल मला काहीच माहित नसल्याचे सांगत वेळ मारून नेली.

औरंगाबाद ः माजी मंत्री तथा भाजपचे निलंग्याचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल खळबळजनक आरोप करत एका नव्या वादाला तोंड फोडले. लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेनेने फिक्सींग केले असा आरोप निलंगेकरांनी केला खरा, पण या त्यांच्या आरोपातून त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे निलंगेकरांनी केलेल्या फिक्सींगच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील नो काॅमेंट्स म्हणत मौन बाळगले आहे.

शिवसेनेतील एका बड्या नेत्यासाठी मुंबईतील जागेच्या बदल्यात लातूर ग्रामीण मतदारसंघात फिक्सगींग करण्यात आले होते. त्यामुळे भाजपकडे असलेली ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली, तिशे शिवसेनेन कुमकूवत उमेदवार देत काॅंग्रेसच्या उमदेवारा मदत केली आणि एकतर्फी विजयाचा मार्ग सुकर केला. शिवसेनेचा उमेदवार प्रचाराला देखील फिरकला नाही, त्यामुळे तिथे नोटा दुसऱ्या क्रमांकावर होते, असा दावा देखील निंलगेकरांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या एक वर्षानंतर निलंगेकरांनी हा गौप्यस्फोट का केला? याची चर्चा जेव्हा लातूर जिल्ह्यात सुरू झाली तेव्हा, या प्रकरणाशी औसा मतदारसंघ व तेथील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचा संबंध देखील जोडला गेला. तशा पोस्टच सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निलंगेकर- अभिमन्यू पवार यांच्यात किती सख्य आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी देण्याला संभाजी पाटील निलंगेकरांचा तीव्र विरोध होता ही बाब काही लपून राहिलेली नाही. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिमन्यू पवार यांना फडणवीसांनी विरोध डावलून उमेदवारी तर दिलीच, पण त्यांना निवडूणही आणले. त्यामुळे निलंगेकरांनी हा अपमान पचवत आपली स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली. दरम्यान एकाच पक्षात असून देखील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात फारसा चांगला संवाद नाही.

आता वर्षभराने लातूर ग्रामीण मतदारसंघासाठी शिवसेनेने फिक्सींग केले हा राज निलंगेकरांनी उघड केला आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात शिवसेनेला मदत व्हावी, यासाठी हे फिक्सींग होते याकडे त्यांनी इशारा केला. भाजपकडे असलेली जागा शिवसेनेला सोडली, त्यांनी ती लढवली नाही, तर काॅंग्रेसचा उमेदवार सहज विजयी कसा होईल, यासाठी प्रयत्न केले हे सांगतांनाच निलंगेकरांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस आणि जिल्ह्यातील काही नेत्यांवरच या फिक्सींगचे आरोप केले आहेत.

राऊत, पाटीलांचे मौन..

विशेष म्हणजे निलंगेकरांच्या या गंभीर आरोप आणि दाव्यावर प्रसार माध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार, दिल्लीतील शेतकरी आंदोलन यावर भरभरून बोलणाऱ्या संजय राऊत यांना जेव्हा लातूरमधील शिवसेनेच्या फिक्सींग व त्यावरील आरोपाबद्दल विचारले तेव्हा, वो रहेने दो, म्हणत त्यावर बोलणे टाळले. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील हात झटकत निलंगेकरांच्या आरोपाबद्दल मला काहीच माहित नसल्याचे सांगत वेळ मारून नेली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख