पुतण्याचे शिलेदार काकांच्या तंबूत;आणखी चार नगरसेवक शिवसेनेत - Nephuew's Shiledar in uncle's tent; for Corporetoers in shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

पुतण्याचे शिलेदार काकांच्या तंबूत;आणखी चार नगरसेवक शिवसेनेत

दत्ता देशमुख
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

जिल्हा नियोजन समिती आणि राज्यातील राष्ट्रवादीच्या खात्यांतून संदीप क्षीरसागर विकास कामांसाठी चांगला निधी मिळवत आहेत. पण, याच वेळी त्यांच्याभोवती काही सल्लागारांचे विशिष्ट कोंडाळे जमले असून हे कोंडाळे कार्यकर्त्यांचा आवाजच त्यांच्यापयंत पोचू देत नसल्याची चर्चा आहे. म्हणूनच मधल्या काळात सल्लागारवजा डॉक्टर ठेकेदाराच्या विरोधात एकेकाळी संदीप क्षीरसागर यांची राजकीय मैदानात साथ देणाऱ्या बीनीच्या शिलेदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

बीड : ज्या नगर पालिकेच्या रणभूमीवर काकांविरुद्ध रणशिंग फुंकून त्यांना जेरीस आणले, तेथूनच आता एकेक शिलेदार काकांच्या तंबूत परतत आहेत. गुरुवारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना आघाडीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुतण्या संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त आणि डाॅ. भारतभूषण क्षीरसगार यांच्याकडून हा दुसरा धक्का आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या विषय समिती सभापती निवडीतही काकू - नाना आघाडीने शस्त्र म्यान केल्याने काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर गटाने सर्व समित्यांवर एकतर्फी झेंडा फडकविला. सत्तेतली आमदारकी मिळाल्यानंतरही संदीप क्षीरसागर समर्थकांत नाराजांची संख्या हळुहळू वाढतच जाण्याचे कारण काय, याची चिकीत्सा आणि त्यावर उपाय योजना होताना दिसत नाही.

शुक्रवारी सीता भैयासाहेब मोरे, गणेश तांदळे यांच्या आई कांताबाई तांदळे, प्रभाकर पोपळे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सभापती दिनकर कदम, विलास बडगे, नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, श्री. गुंजाळ आदींची उपस्थिती होती.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर घराणे एकेकाळी सर्वात ताकदवान. दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी राजकीय कौशल्याने एकेकाळी जिल्ह्यावर राजकीय हुकूमत गाजवली. पुढच्या पिढीत त्यांचे जेष्ठ पुत्र जयदत्त क्षीरसागर विधानसभा, दुसरे रवींद्र क्षीरसागर कारखाना आणि जिल्हा परिषद, तिसरे डॉ. भारतभूषण क्षीरसागर बीड नगरपालिका अशा अलिखीत राजकीय वाटण्या झाल्या. जयदत्त क्षीरसागर यांनीही उपमंत्री ते विविध महत्वाच्या खात्यांचे कॅबीनेट मंत्री म्हणून यशस्वी राजकीय वाटचाल केली.

तर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी साधारण ३० ते ३० वर्षांपासून एका टर्मचा अपवाद वगळता बीड पालिकेवर सत्ता अबाधित ठेवली. राज्यात सर्वाधिक काळत नगराध्यक्ष राहणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव यादीत सर्वात वर असावे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेनंतर क्षीरसागर घराणे राष्ट्रवादीसोबत गेले. दरम्यान, तिसऱ्या पिढीत संदीप क्षीरसागर राजकारणात आले आणि पहिल्याच निवडणुकीत पंचायत समितीच्या माध्यमातून सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

दुसऱ्यावेळी जिल्हा परिषद निवडणुक लढवून विजयी झालेल्या संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य आणि बांधकाम अशी महत्वाची खाती भेटली. अपसूक ग्रामीण भागात त्यांची चांगली पकड निर्माण झाली. मात्र, मागच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी समर्थकांच्या उमेदवारीसाठी काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना गळ घातली. पण, यादी भलीमोठी असल्याने काकांनी नकार दिला आणि संदीप क्षीरसागर यांनी काकू - नाना आघाडीची स्थापना करत जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान दिले.

क्षीरसागरांच्या घरातील काका - पुतण्या अंकाची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चा झाली. नगर पालिकेत त्यांनी वडिल रविंद्र क्षीरसागर यांना काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी उभा केले. काका - पुतणे अंक आणि सख्या भावांची लढत यामुळे ही चुरशीची निवडणुक तेवढीच चर्चेचीही ठरली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकता आले असले तरी आघाडीने त्यावेळी काकांना चांगलेच जेरीस आणले. अगदी राष्ट्रवादीपेक्षा (जयदत्त व भारतभूषण क्षीरसागर त्यावेळी राष्ट्रवादीत होते) काकू - नाना आघाडीला एक जागा अधिकची मिळाली.

त्यावेळच्या एमआयएमला गळालाल लाऊन उपनगराध्यपदावर संदीप क्षीरसागर यांचे धाकटे बंधू हेमंत क्षीरसागर बसले तर सर्व विषय समित्यांवही आघाडीने बाजी मारत पालिकेतील निम्मी सत्ता हाती घेतली. दरम्यान, त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीतीलच अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे यांनी बळ दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जयदत्त व भारतभूषण क्षीरसागर बंधूंनी थेट भाजपचा प्रचार केला. पण, प्रवेश शिवसेनेत केला.

शिवसेनेनेही त्यांचा सन्मान करत सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रीपद दिले. अपसुकच विधानसभेच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. पुन्हा एकदा थेट काका आणि पुतणे अशा लढतीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेचे उमेदवार काका जयदत्त क्षीरसागर यांना चित केले. योगायोगाने राष्ट्रवादी सत्तेत गेली. सुरुवातीला भाजप - राष्ट्रवादी सत्तास्थापना नाट्यावेळी त्यांनी अजित पवारांचा तंबू सोडून थेट पवारांची कुस धरल्याने धनंजय मुंडे यांची त्यांच्यावर काही काळ खप्पामर्जी होती. पण, अमरसिंह पंडित यांच्या मध्यस्थीने पुन्हा पॅचअप झाले आहे.

सल्लागारांचे कोंडाळे वाढले अन्..

त्यामुळे जिल्हा नियोजन समिती आणि राज्यातील राष्ट्रवादीच्या खात्यांतून संदीप क्षीरसागर विकास कामांसाठी चांगला निधी मिळवत आहेत. पण, याच वेळी त्यांच्याभोवती काही सल्लागारांचे विशिष्ट कोंडाळे जमले असून हे कोंडाळे कार्यकर्त्यांचा आवाजच त्यांच्यापयंत पोचू देत नसल्याची चर्चा आहे. म्हणूनच मधल्या काळात सल्लागारवजा डॉक्टर ठेकेदाराच्या विरोधात एकेकाळी संदीप क्षीरसागर यांची राजकीय मैदानात साथ देणाऱ्या बीनीच्या शिलेदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

पण, शिलेदारांची साधी समजूत काढण्याची तसदीही घेतली गेली नाही. यावरुन आता शिलेदारांपेक्षा सल्लागारांचा कोंडाळा किती वाढला याचा अंदाज येतो. दरम्यान, नगर पालिकेतही हळुहळु नाराजांची संख्या वाढत जात आहे. मागच्या काही काळात गुंजाळ, पिंगळे आदी नगरसेवकांनी साथ सोडून शिवसेनेचा तंबू गाठलाच होता. तर, काही दुसऱ्या तंबूत नसले तरी संदीप क्षीरसागरांच्या तंबूतूनही दुर आहेत. आता पुन्हा शुक्रवारी आणखी चौघांनी संदीप क्षीरसागर यांचा तंबू सोडून शिवसेनेच्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा तंबू पकडला आहे. असेच सल्लागारांचे कोंडाळे कायम राहीले तर आणखी काही शिलेदारांना विरोधकांचा तंबू अधिक आवडेल यात शंका नाही.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख