विकास कामांवर माझे लक्ष, वेळोवेळी प्रगती पहायला येईन .. - My focus on development work, I will see progress from time to time: Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

विकास कामांवर माझे लक्ष, वेळोवेळी प्रगती पहायला येईन ..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मनपाने आकृतीबंध सादर करावा. शासनाने जिल्ह्यातील गुंठेवारी जमिनीचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शहराची महत्त्वपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर भराडी-वांगी धरणाबाबतचा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगतिले.

औरंगाबाद : नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन योजना राबवा, जिल्ह्यातील विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील विकास कामांवर माझे लक्ष असून, या कामांची प्रगती पाहण्यासाठी वेळोवेळी येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत सांगितले. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, याची जाणीव करून देत माझे कुटंब माझी जबाबदारी जाणीव पावलागणिक जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्याच्या विविध विकास कामांची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द देतांनाच प्राधान्य क्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, भयंकर अशा कोरोना महामारीच्या काळामध्ये यंत्रणांनी कौतुकास्पद कार्य केलेले आहे. या संकटावर यंत्रणेच्या पुढाकाराने मात करणे शक्य झाले. त्यातच शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस मोठ्याप्रमाणात राज्यात प्रतिसाद मिळाला. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिन्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची लावण्यात आलेले स्टीकर्स या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जनजागृती होण्यास हातभार लागला आहे. अशाच प्रकारचा उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा.

लोणार सरोवरासंदर्भात लोणार येथे बैठक घेतली, त्यासंदर्भात करावयाचे संवर्धन आणि विकास याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. अशाप्रकारचा अमुल्य असा ठेवा आपल्या राज्यात विविध ठिकाणी आहे, त्यांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक कृषी पंपाची वीज जोडणी, घाटी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या औषधी साठ्यासाठी निधी देणार असल्याचे सांगतानाच त्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याच्या सूचना ठाकरे यांनी बैठकीत केल्या.

औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मनपाने आकृतीबंध सादर करावा. शासनाने जिल्ह्यातील गुंठेवारी जमिनीचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शहराची महत्त्वपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर भराडी-वांगी धरणाबाबतचा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगतिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, असे वाटत असले तरी मास्कचा वापर करा. कारण मास्क हीच आपली लस आहे याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी केला. 

कचरा प्रश्न सोडवण्यात यश- देसाई

पालकमंत्री देसाई यांनी या बैठकीत माहिती देतांना शहरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यात शासन, प्रशासन यशस्वी झाल्याचे सांगितले. लवकरच हर्सुल कचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहर कचरा शुन्यतेकडे वाटचाल करेल. जिल्ह्यातील गुंठेवारीचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावला आहे. शहरासाठी १६८० कोटी रुपयांची राज्यातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना राबविण्यास सुरूवात केलेली आहे. शहरात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मनपाला पाठबळ दिलेले आहे.

जिल्हा प्रशासनाचा उभारी उपक्रम नाविन्यपूर्ण असा आहे, सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, नागरिकांची त्याला संमती असेल, अशी कामे या जिल्ह्यात चांगले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून होत आहेत. औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासनाने कार्यवाही पार पाडावी, अशा सूचनाही देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.

ही कामे प्रगतीपथावर..

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अधिकारी नियुक्ती करणे, पैठण औरंगाबाद पाईपलाईन चार पदरी रस्त्यामध्ये जाणार नसल्याचे काम, सिल्लोडमध्ये मक्याचे उत्पादन जास्त प्रमाणात असल्यामुळे सिल्लोड हद्दीमध्ये शासकीय मका हब प्रक्रिया कारखाना सुरू करणे, रब्बी पिक विमासाठी कंपन्या निश्चित करणे, कृषी विभागासाठी रिक्त जागा भरणे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुसूत्रीकरण करणे, अटल भूजल योजनेंतर्गत पाझर तलावाचे रिचार्ज शाप्टचे काम प्रस्तावित करणे, औरंगाबाद जिल्हा परिषदेला नवीन प्रशासकीय इमारत बांधा, वापरा आणि हस्तांरित करा या तत्वावर तपासणे, ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन व शेतकऱ्यांसदर्भात न्यायालयाची परवानगी घेऊन भूसंपादन करणे, ट्रान्सफॉर्मरसाठी ऑईल उपलब्ध करून देणे, वैजापूर ट्रामा केअर सेंटर बांधकाम पूर्ण करणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. तर अन्य कामे प्रगतीपथावर असल्याचे बैठकीत सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख