मुंडे, शेख यांच्यावरील महिला अत्याचाराच्या आरोपाने राष्ट्रवादीवर संक्रांत..

पक्षातील काही नेत्यांवरील आरोप आणि कारवायांमुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीला या संकटातून शरद पवार यांना पक्षालासुखरूप बाहेर काढावे लागणार आहे.
dhananjay munde
dhananjay mundeSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघा़डी सरकारमध्ये प्रबळ असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसवर सध्या संक्रांत आली आहे. महिनाभरापुर्वी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण अजून शांत झाले नाही तोच महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री आणि महत्वाचे नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईतील एका तरुणीने अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे महिलांवरील अत्याचारांची ही दोन प्रकरणे चव्हाट्यावर आलेली असतांनाच आणखी एक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांचे जावई समीर खान यांना देखील एनएसबीने ड्ग्ज प्रकरणात अटक केली आहे. एकोपाठोपाठ एक असे तीन धक्के राष्ट्रवादीला बसल्याने हा पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. कुठल्याही संकटावर मात करून पुढे जाण्यात हातोटी असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पक्षावर आलेल्या या संक्रातीवर कसे मात करतात? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील काही महत्वाच्या नेत्यांच्या बाबतीत काही प्रकार, घटना समोर आल्या. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख यांच्यावर एका २९ वर्षीय शिक्षित तरूणीने २६ डिसेंबर रोजी औरंगाबादेत आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आणि या प्रकरणात मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा देखील दाखल झाला. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. मेहबूब शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार, राष्ट्रवादीकडेच असलेले गृहखाते व त्याचे मंत्री अनिल देशमुख करत असल्याचा आरोप विरोधी भाजपकडून केला गेला. मेहूबब शेख यांना अटक करण्यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन देखील केले.

हे प्रकरण काहीसे शांत होत असतांनाच राष्ट्रवादीला दुसरा झटका बसला तो बीड जिल्ह्यातीलच धनंजय मुंडे यांच्या रुपाने. परस्पर सहमतीने संबंधात असलेल्या तरुणीच्या बहिणीनेच दोन दिवसांपुर्वी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. प्रसार माध्यम आणि सोशल मिडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू होताच, धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुक पेजवरून या संपुर्ण प्रकरणाची माहिती देत तक्रारदार तरुणीच्या बहिणी सोबत २००३ पासून परस्पर सहमतीने असलेले संबंध, त्यातून झालेली दोन मुलं, त्यांना मुंडे यांनी आपले दिलेले नाव याची जाहीर कबुली दिली.

हे प्रकरण चिघळून आपल्या मंत्रीपदावर गंडांतर येऊ नये याची काळजी धनंजय मुंडे यांनी घेतली खरी, पण आता ही कबुलीच त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. निवडणूक शपथ पत्रात त्यांनी दुसऱ्या पत्नी, किंवा मुलांचा उल्लेख केला का? याची चर्चा आणि नसेल तर मग निवडणूक आयोग त्यांची आमदारकी रद्द करणार का? यावर आता खल सुरू झाला आहे. विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी देखील सुरू केली. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मुंबईत शरद पवार, अजित पवार या नेत्यांची भेट घेऊन संपुर्ण प्रकरणाची माहिती दिल्याचे देखील समजते. धनंजय मुंडेचे काय करायचे? त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा का? याचा निर्णय शरद पवार घेणार असल्याचीही चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील शरद पवार हे भेट घेणार आहेत.

एकंदरित धनंजय मुंडे यांना हे प्रकरण महागात पडणार अशी चिन्हे आहेत. पक्षात तशा बऱ्याच हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. मेहबूब शेख आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील महिला अत्याचाराच्या आरोपाने राष्ट्रवादी काॅंग्रेस बॅकफुटवर आली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, पक्ष आरोप झालेल्या नेत्यांना पाठीशी घालत नाही हे कृतीतून दाखवण्यासाठी धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाने कारवाई केली तर तोच न्याय मेहबूब शेखलाही लावला जाईल आणि या दोन नेत्यांच्या गच्छंतीने राष्ट्रवादी आपली बिघडलेली प्रतिमा काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न करेल. यातून पक्षात चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा दिला जाणार नाही, तो नेता कितीही मोठा असला तरी, हा संदेश देखील शरद पवार देऊ शकतात.

बीड जिल्ह्यासाठी मोठा धक्का..

धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख हे दोघेही बीड जिल्ह्यातील नेते आहेत. दोघेही आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात पुढे आलेले. पण दुर्दैवाने दोघांवरही महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पक्षाकडून या दोघांवर कठोर कारवाई झाली तर बीड जिल्ह्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील विरोधक पंकजा मुंडे, जयद्त्त क्षीरसागर, सुरेश धस हे देखील या परिस्थितीचा आपापली ताकद वाढवण्यासाठी वापर करतील. धनंजय मुंडे यांना या प्रकरणाची मोठी राजकीय किमंत मोजावी लागणार असे दिसते.

मेहबूब शेख याची राजकीय वाटचाल तर आता कुठे सुरू झाली होती, मुंडे, शेख यांचे जसे वैयक्तिक नूकसान या प्रकरणामुळे होणार आहे, तसे ते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे देखील होणार आहे. पण पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी पक्ष नेतृत्वाला या दोघांच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहे, तशी तयारी देखील सुरू झाली आहे.

नवाब मलिकांचे काय होणार?

राष्ट्रवादी तिसरे महत्वाचे नाव देखील सध्या अडचणीत आले आहे. ते म्हणजे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक. मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्ग्ज प्रकरणात एनएसबीच्या कारवाईवरून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचा या प्रकरणाशी तसा संबंध नसला तरी समीर खान हे त्यांचे जावई असल्याने याच्या झळा मलिक यांना देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात १०५ आमदार असलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेपासून रोखण्यात यश मिळवले, तीन भिन्न विचारांच्या पक्षाला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन करून एक चमत्कार घडवला. केंद्र सरकारकडून ईडीच्या मार्फत सुरू केलेल्या सुडाच्या कारवाया त्यांच्यावरच उलटवत राजकारणातील आपणच खरे पैलवान असल्याचे दाखवून दिले. पण आता पक्षातील काही नेत्यांवरील आरोप आणि कारवायांमुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीला या संकटातून देखील त्यांना सुखरूप बाहेर काढावे लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com