मनसेकडून अल्टीमेटमची पुन्हा आठवण, `संभाजीनगर`साठी विभागीय आयुक्तांना पत्र.. - MNS recalls ultimatum, letter to divisional commissioner for Sambhajinagar` .. | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेकडून अल्टीमेटमची पुन्हा आठवण, `संभाजीनगर`साठी विभागीय आयुक्तांना पत्र..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

गेल्या महिन्यात मनसेने शहरात प्रमुख रस्त्यांवर येत्या २६ जानेवारीपर्यंत संभाजीनगर करा, नाही तर, असा सज्जड दम भरणारे पोस्टर झळकावले होते. या शिवाय राज्यभरात औरंगाबादला येणाऱ्या एसटी बसेसवर संभाजीनगरचे स्टीकर चिटकवण्याची मोहिम देखील मनसेने हाती घेतली होती. मनसेने दिलेली डेडलाईन जवळ आल्यामुळे आज पुन्हा त्यांनी प्रशासनाला संभाजीनगरची आठवण करून दिली.

औरंगाबाद ः येत्या २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे संभाजीनगर करा, नाही तर.. असे फलक शहरभर लावत मनसेने महापालिका व जिल्हा प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. आज पुन्हा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी प्रशासनाला या अल्टीमेटमची आठवण करून देत निवदेन दिले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, विभागीय आयुक्तांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना सरकारपर्यंत तात्काळ पोहचवून नामांतराचा निर्णय घ्यावा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोनल करेल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूका अजून जाहिर झालेल्या नसल्या तरी दर निवडणुकीत पुढे येणारा औरंगाबादचे संभाजीनगर करा, हा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवसेना, भाजप आणि मनसे या तीन्ही पक्षांनी संभाजीगरचा आग्रह धरला आहे. सत्तेत असणारी शिवसेना लाचार आहे, त्यांच्याकडून हे शक्य नाही. सत्ता हवी की लाचारी अशा शब्दांत मनसे शिवसेनेवर सातत्याने टीका करते आहे.

गेल्या २५-३० वर्षापासून शिवसेनेने हा संभाजीनगरचा विषय हा फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापरला. पण दोनवेळा राज्यात सत्ता येऊन देखील त्यांना संभाजीनगर करता आले नाही. आता देखील राज्यात महाविकास आघाडीेचे सरकार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर करावे, अशी मागणी मनसेने सातत्याने लावून धरली आहे.

एवढेच नाही तर गेल्या महिन्यात मनसेने शहरात प्रमुख रस्त्यांवर येत्या २६ जानेवारीपर्यंत संभाजीनगर करा, नाही तर, असा सज्जड दम भरणारे पोस्टर झळकावले होते. या शिवाय राज्यभरात औरंगाबादला येणाऱ्या एसटी बसेसवर संभाजीनगरचे स्टीकर चिटकवण्याची मोहिम देखील मनसेने हाती घेतली होती. मनसेने दिलेली डेडलाईन जवळ आल्यामुळे आज पुन्हा त्यांनी प्रशासनाला संभाजीनगरची आठवण करून दिली.

मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरचे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन संभाजीनगर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हिंदुजननायक राज ठाकरे यांनी देखील या शहाराचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली. शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ मध्येच या शहराला संभाजीनगर असे नाव दिलेले आहे. लाखो हिंदुची ही मागणी असून जनतेच्या या भावना सरकार दरबारी पोहचवून तातडीने निर्णय घेण्याची मागणी मनसेने केली आहे.

Edited By : Jagdish Pansare 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख