अशोक चव्हाणांमुळेच मराठा समाजाचे नुकसान; त्यांनी राजीनामा द्यावा.. - Loss of Maratha community due to Ashok Chavan; He should resign | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाणांमुळेच मराठा समाजाचे नुकसान; त्यांनी राजीनामा द्यावा..

लक्ष्मण सोळुंके
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अशोक चव्हाण हे स्वतः  आणि त्यांचा काॅंग्रेस पक्ष राज्यात सर्वाधिक काळ सत्तेवर होता. अशोक चव्हाण देखील या राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांना स्वतःला मराठा म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नाही.  यापुढे त्यांनी स्वतःला मराठा म्हणवून घेऊ नये ,शिवाय मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष पदासह मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा.

जालना ः अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला, त्यांच्यामुळेच समाजाचे मोठे नुकसान देखील झाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा तर द्यावाच, पण त्यांच्या पाच पिढ्यांनी यापुढे राजकारणात येऊ नये, अशी घणाघाती टिका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. तत्कालीन भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण व सवलती महाविकास आघाडी सरकारला टिकवता आल्या नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील साष्टीपिंपळगांव इथे सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी नरेंद्र पाटील आज आले होते. आंदोलनस्थळी भेट देऊन आल्यानंतर त्यांनी जालना येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत अशोक चव्हाण, महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्र्यावर टीका केली.

नरेंद्र पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी स्वतःला मराठा म्हणवून घेऊ नये, त्यांच्यामुळेच मराठा समाजाला खूप त्रास झाला. चव्हाण यांनी मंत्रीपदाचा राजीनामा तर द्यावाच, पण त्यांच्या पुढील पाच पिढ्यांनी राजकारणात येऊ नये .मागच्या सरकारने मराठा समाजासाठी सुरु केलेल्या सर्व सवलती महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या.

मराठा आरक्षणाच्या सुनावणीला सरकारचे वकील हजर राहत नाही, आपली बाजू व्यवस्थीत मांडत नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे, ती घ्यायची नसेल तर मग अध्यक्ष कशाला झालात. मराठा समाजाला मागच्या सरकारने दिलेल्या सवलती, सारथीसाठी दिलेला निधी, वस्तीगृहे हे सगळं या सरकारने रद्द केले. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा सुरू आहे.

अशोक चव्हाण हे स्वतः  आणि त्यांचा काॅंग्रेस पक्ष राज्यात सर्वाधिक काळ सत्तेवर होता. अशोक चव्हाण देखील या राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांना स्वतःला मराठा म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नाही.  यापुढे त्यांनी स्वतःला मराठा म्हणवून घेऊ नये ,शिवाय मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष पदासह मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता राज्यभरात, तालुकास्तरावर पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील नरेंद्र पाटील यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख