उद्धव ठाकरेंच्या तोंडून धर्मनिरपेक्षतेची भाषा शोभत नाही..

निवडणुका आल्या की दर पाच वर्षांनी संभाजीनगरचा मुद्दा आणायचा आणि शहरवासीयांच्या भावना भडकवायच्या याचा धंदा आणि ठेकाच या पक्षांनी घेतला आहे. जगात आपल्या शहराची ओळख आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी होती, आज कचऱ्याचे शहर अशी ओळख झाली आहे. याची नावाचे राजकारण करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. नाव बदलंल की शहरातील सगळे प्रश्न मिटतील का?
Imtiaz jalil fb live news Aurangabad
Imtiaz jalil fb live news Aurangabad

औरंगाबाद ः शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्यावरून शिवसेनेकडून गेल्या तीस वर्षापासून राजकारण सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुका आल्या, की हिंदू-मुस्लिम, हिरवा, भगवा असे वाद निर्माण करायचे, लोकांच्या भावना भडकावायच्या आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा शिवसेना-भाजप यांचा धंदाच बनला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच सेक्युलिरिझम बद्दल एक विधान केले. ते ऐकून तर मला आश्चर्यच वाटले. ज्या पक्षाचा जन्मच जातीयवादातून झाला, त्या पक्षाच्या नेत्याच्या तोंडून धर्मनिरपेक्षतेची भाषा शोभत नाही, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा मुद्दा सध्या राज्यभरात गाजतोय. शिवसेना-भाजप, काॅंग्रेस, मनसे या पक्षांनी या वादात उडी घेतली आहे, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसने या वादावर आपली भूमिका स्पष्ट नकरता तुर्तास स्वतःला या वादापासून दूर ठेवले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी या मुद्यावर आपली सविस्तर भूमिका मांडतांनाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा मुद्या पुढे करून लोकांची माथी भडकवण्याचा शिवसेना-भाजपचा हा धंदाच असल्याची टीका केली आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडिओ इम्तियाज जलील यांनी जारी केला आहे. यात त्यांनी खरे प्रश्न विरुध्द खोटे मुद्दे असे म्हणत संभाजीनगर नावावरून राजकारण करणाऱ्या शिवसेना-भाजप व कुठलीही भूमिका न घेता काठावर बसलेल्या राष्ट्रवादीला देखील खडेबोल सुनावले आहे. इम्तियाज जलील म्हणतात, गेली तीस वर्ष महापालिकेत सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या शिवसेना-भाजपकडून संभाजी महाराजांच्या नावाचा दुरुपयोग आणि अक्षरशः धंदा सुरू आहे. ज्या शहरामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, रस्त्यावर खडे आहेत, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग आहेत, त्या शहरातील नागरिकांना काय पाहिजे हे एकदा या राजकीय पक्षांनी विचारात घेतले पाहिजे.

शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपापल्या घरातील आया-बहिणींना एकदां विचारावे, की तुम्हाला पाणी पाहिजे की संभाजीनगर? त्यावर आम्हाला पाणी पाहिजे असेच उत्तर त्यांना मिळेल. पण निवडणुका आल्या की दर पाच वर्षांनी संभाजीनगरचा मुद्दा आणायचा आणि शहरवासीयांच्या भावना भडकवायच्या याचा धंदा आणि ठेकाच या पक्षांनी घेतला आहे. जगात आपल्या शहराची ओळख आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी होती, आज कचऱ्याचे शहर अशी ओळख झाली आहे. याची नावाचे राजकारण करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. नाव बदलंल की शहरातील सगळे प्रश्न मिटतील का? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला.

हाॅस्पीटल पाहिजे की संभाजीनगर ?

महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना- भाजपची केंद्रात आणि राज्यात देखील सत्ता होती, पण तेव्हा कुणी संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित केला नाही? पण महापालिका निवडणुका आल्या की यांना संभाजी महाराजांची आठवण होते. या पक्षांना विकासाशी काही देणंघेणं नाही, असा दावा करतांनाच इम्तियाज जलील यांनी एक उदाहरण दिले. इम्तियाज जलील म्हणाले, २०१३ मध्ये मी शहरात एक २०० खाटांचे हाॅस्पीटल व्हावे, यासाठी जागेचा शोध सुरू होता. पण या हाॅस्पीटलची जागा गोपीनाष मुंडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिली गेली.

मी २०१४ मध्ये आमदार झाल्यानंतर विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत हाॅस्पीटल लवकर उभारले जावे अशी मागणी केली. २०१३ ते २०१७ या चार वर्षात त्यावर सरकारने कुठलीच भूमिका घेतली नाही. शेवटी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  दरम्यान, या दोनशे खाटांच्या हाॅस्पीटलसाठी निधी आणि जागा देखील मंजुर झाली. पण प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. उच्च न्यायालयाने एप्रिल २०२० मध्ये राज्य सरकारला हाॅस्पीटलचे काम कधी सुरू करणार अशी विचारणा केली होती. आता जानेवारी २०२१ उजाडले तरी याचे उत्तर तेव्हाच्या आणि आताच्या सरकारने ही कोर्टाला देखील दिलेले नाही.

तेव्हाच्या फडणीवस सरकारने आणि आताच्या आघाडी सरकारमधील किती मंत्री, नेत्यांनी या हाॅस्पीटलसाठी आग्रह धरला, महापालिकेने आणि स्थानिक नेत्यांनी यासाठी किती प्रयत्न केले? असा सवाल करतांनाच नागरिकांनी आता अशा जातीय राजकारणाला बळी न पडता दोनशे खाटांचे हाॅस्पीटल कधी होणार? याचा जाब नवाचे राजकारण करणाऱ्यांना विचारावा, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले. मला छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू-फुले यांचा आदर आहे. किंबहुना त्यांच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा जास्तच आहे. पण आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा वापर करण्यास माझा तीव्र विरोध असल्याचेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com