चुकून निवडून आलेला खासदार म्हणत खैरेंची इम्तियाज जलील यांच्यावर टिका.. - Khaire criticizes Imtiaz Jalil for being an MP who was elected by mistake | Politics Marathi News - Sarkarnama

चुकून निवडून आलेला खासदार म्हणत खैरेंची इम्तियाज जलील यांच्यावर टिका..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

ज्या व्हिडिओचा उल्लेख करत ते शिवसेनेवर टीका करत आहेत, ते चुकीचे आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच असे चुकीचे कृत्य करत नाही. गाडीवर लोगो आहे म्हणजे ते शिवसैनिकच आहे हे म्हणणे देखील चुकीचे आहे. उलट खासदार इम्तियाज जलील ज्या भागात राहतात, त्यांच्या घरामागेच गोळीबाराची घटना घडली. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, मगच शिवसेनेवर टीका करावी.

औरंगाबाद ः बंदूकीच्या धाक दाखवत महामार्गावरील वाहतुकीतून मार्ग काढणाऱ्या वाहनाचा व्हिडिओ ट्विट करत खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. सदर गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्याने उघडपणे बंदूक काढत दहशत पसरवणारे शिवसैनिकच होते असा दावा इम्तियाज यांनी केला होता. यावर शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी चुकून निवडून आलेला खासदार असा उल्लेख करत इम्तियाज यांच्यावर टीका केली. आधी तुमच्या घराच्या मागे होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेवर बोला मग, शिवसेनेवर बोला, असा घणाघातच खैरे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे  विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका, कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोना काळात हिंदूंची मंदिरे खुली करण्याची मागणी करताच खैरे यांनी तुमचे अपिवत्र हात आमच्या मंदिरांना लागू देणार नाही, आम्ही मंदिरे खुली करण्यास समर्थ आहोत, असे म्हणत इम्तियाज जलील स्टंटबाजी करत असल्या आरोप केला होता. हे दोन्ही नेते समोरासमोर आले की काही तरी खटकणार हे निश्चित.

दोन दिवसांपुर्वी इम्तियाज जलील यांनी मुंबई महामार्गावर शिवसेनेचा लोगो असलेली गाडी व त्यातून बंदूक काढून मार्ग काढणारे लोक याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे की महागुंडा सरकार, अशी टीका त्यानंतर समाज माध्यमांमधून सुरू झाली होती. इम्तियाज यांनी शिवसेनेचा लोगो असल्यामुळे या प्रकरणाशी थेट शिवसेनेचा संबंध जोडल्याने खैरे चांगलेच भडकले. त्यांनी चुकून निवडून आलेला खासदार असा उल्लेख करत इम्तियाज यांच्यावर तोंडसुख घेतले.

खैरे म्हणाले, इम्तियाज जलील निवडून आल्यापासून शहरात दादागिरी वाढली असून वातावरण खराब होत आहे. प्रत्येक गोष्टीत, वादात नाक खुपसण्याची त्यांची सवय यामुळे सर्वसामान्य नागरीक देखील हैराण झाले आहेत. खासदार म्हणून त्यांना निवडूण दिल्याचा लोकांना आता पश्चाताप होत आहे. मुस्लिम समाजामध्ये देखील त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे.

ज्या व्हिडिओचा उल्लेख करत ते शिवसेनेवर टीका करत आहेत, ते चुकीचे आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच असे चुकीचे कृत्य करत नाही. गाडीवर लोगो आहे म्हणजे ते शिवसैनिकच आहे हे म्हणणे देखील चुकीचे आहे. उलट खासदार इम्तियाज जलील ज्या भागात राहतात, त्यांच्या घरामागेच गोळीबाराची घटना घडली. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, मगच शिवसेनेवर टीका करावी, असा टोला देखील खैरे यांनी इम्तियाज यांना लगावला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख