औरंगाबाद ः गृहमंत्र्यांना दररोज शेकडो लोक, पदाधिकारी, कार्यकर्ते भेटायला येत असतात. त्या सगळ्यांची माहिती त्यांना असणे शक्य नाही, त्यामुळे गुन्हेगारांनी त्यांच्यासोबत फोटो काढले यात त्यांचा दोष नाही. मुळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची गृहमंत्र्यांसोबत भेट कुणी घडवून आणली हे शोधले पाहिजे, असे म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या वादात उडी घेतली आहे.
औरंगाबाद येथे दोन दिवसांपुर्वी झालेल्या शक्ती समितीच्या बैठकीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख शहरात आले होते. यावेळी सुभेदारी विश्रामगृहातील त्यांच्या एका भेटीगाठीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. कारण या फोटोमध्ये जे तीन लोक गृहमंत्र्यांच्या सोबत उभे आहेत, त्या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांनी फोटो काढल्यामुळे याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले असतांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीघांपैकी दोघे हे पुर्वी एमआयएममध्ये होते. त्यांची पक्षाने कधीच हाकलपट्टी केली होती. त्यामुळे या विषयावर इम्तियाज जलील यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची समजली जाते. प्रसार माध्यमाशी बोलतांना इम्तियाज यांनी गृहमंत्र्यांची बाजू घेत गुन्हेगारांसोबतच्या फोटोबद्दल त्यांचा काही दोष नसल्याचे म्हटले आहे. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. प्रत्येकाची माहिती किंवा ओळख असणे त्यांना शक्य नसते.
अशावेळी गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत वावरणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे ते काम आहे, की मंत्र्यांना भेटायला येणारे लोक कोण आहेत? त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? असेल तर ते स्पष्ट करून मंत्र्यांना अशा लोकांना भेटण्यापासून रोखले गेले पाहिजे. पण या प्रकरणात असे झालेले नाही. बलात्कार, तडीपारीची कारवाई प्रस्तावित असलेले गुन्हेगार जर गृहमंत्र्यांसोबत फोटो काढत असतील तर ते चुकीचे आहे. पण याची काळजी पोलीस अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक होते.
भेट घडवणारा गुन्हेगारच..
इम्तियाज जलील यांनी या निमित्ताने राष्ट्रवादीच्या शहरातील एका बड्या नेत्यावर निशाणा साधल्याची चर्चा देखील सुरू आहे. ज्या तीन गुन्हेगारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोटो काढले, त्यांची भेट मुळात कुणी घडवून आणली? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. पांढरे कपडे घालून शरद पवारांच्या मागेपुढे फिरणारा स्वतःला मोठा नेता म्हणवून घेणाराच गुन्हेगार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Edited By : Jagdish Pansare

