औरंगाबाद ः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबादेतील वक्फ बोर्डाची जागा परस्पर विक्री करून शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्या आरोप केला होता. जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शहरातील काही बिल्डर, व्यापाऱ्यांची नावे घेऊन हा खळबळजनक दावा केला होता. आता या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर इम्तियाज जलील यांची राज्य सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
गेल्या तीन वर्षात व त्याआधी देखील औरंगाबादच्या जालना रोडवरील जवळपास एक लाख स्केवअरफूट वक्फ बोर्डाची जागा मुतवल्ली, वक्फ बोर्डातील काही अधिकारी, महापालिका, भूमिअभिलेख, रजिस्ट्री कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून बिल्डर व व्यापाऱ्यांना विकल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. शंभर कोटीहून अधिकचा हा घोटाळा असून या प्रकरणाती दोषींना तुरुंगात पाठवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा आक्रमक पावित्रा देखील त्यांनी घेतला.
पंतप्रधान कार्यालयापासून, केंद्रातील अल्पसंख्याक विभागाचे सचिव आणि राज्याचे गृहमंत्री या सगळ्यांना आपण वक्फ बोर्डाच्या जागा परस्पर विकल्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केल्याचे दस्तावेज देखील इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दाखल केले होते. त्यानंतर दोन आठवड्यातच इम्तियाज जलील यांची राज्य सरकारकडून महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य म्हणून नेमणूक केली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांना देखील सदस्यपद बहाल करण्यात आले आहे.
या नियुक्तीचा आणि इम्तियाज जलील यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा अर्थाअर्थी संबंध नसला तरी हा निव्वळ योगागोगही असेल असे मानण्याचे कारण नाही. वक्फ बोर्डाची जागा परस्पर विक्री करून शंभर कोटीहून अधिकाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलीक यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. आता वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने इम्तियाज जलील यांना एक प्रकारे बळ मिळाले आहे असेच म्हणावे लागेल.
उपोषणाची जोरदार तयारी ..
वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहारात मोठ मोठे लोक अडकलेले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी दडपण्यासाठी ते कुठल्या थराला जावू शकतील, मला देखील अनेकांचे फोन आल्याचा खुलासा देखील इम्तियाज जलील यांनी त्याच पत्रकार परिषदेत केला होता. तसेच महिनाभरात या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही तर आपण एक हजार कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील इम्तियाज यांनी दिला होता.
गैरव्यवहाराचा दावा करून दोन आठवडे उलटले मात्र चौकशीच्या दिशेने ठोस पावले अद्याप उचलली गेलेली नाही. इम्तियाज जलील स्वतः यासाठी पाठपुरावा करत आहे. चौकशी होत नाही असे लक्षात आल्यामुळे त्यांनी २६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणाची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. उपोषणाला बसू इच्छिणाऱ्यांची नाव नाेंदणी करण्यात येत असून आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगत इम्तियाज जलील हे दबाव निर्माण करत असल्याचे देखील बोलले जाते.
Edited By : Jagdish Pansare

