नरेंद्र मोदींचा चार्ज काढून घेण्यासाठी माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज.. - I have the charge of the post of state president to remove the charge of Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींचा चार्ज काढून घेण्यासाठी माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

एकीकडे देशातील उद्योग धंदे डबघाईला आले, तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, तर दुसरीकडे हम दो हमारे दो यांची संपत्ती मात्र तासाला नव्वद कोटींनी वाढत होती. मग तुम्ही कुणाचे एजंट म्हणून काम करत होतात, याचे उत्तर द्या. अमित शहा यांची संपत्ती किती पटीने वाढली, असा सवाल देखील पटोले यांनी केला.

मुंबई ः काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार हाती घेतला तेव्हा मी तुमच्या वतीने आपल्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी यांना काॅंग्रेस एक नंबरचा करणार असा शब्द दिला आहे. राज्यात पुन्हा काॅंग्रेसची सत्ता आणयाची आहे, त्यासाठी महात्मा गांधीच्या विचारांवर वाटचाल करत सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आॅग्स्ट क्रांती मैदानावरून केले.

देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकार व भाजपचा चार्च काढून घेण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला असल्याचेही पटोले यांनी यावेळी सांगितले.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर मुंबईच्या आॅगस्ट क्रांती मैदानात आज राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकारला चले जाव सांगण्याचा ठराव देखील संमत करण्यात आला. अधिवेशनानंतर याच ठिकाणी नाना पटोले यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंंतर नाना पटोले यांनी आपल्या पहिल्याच भाषणात केंद्रातील मोदी सरकार व भाजपवर कठोर टीका केली.

मोदी सरकारने देश विकायला काढला असून, तुम्हाला लोकांनी यासाठी निवडूण दिले का? असा सवाल करत नाना पटोले म्हणाले, हा देश उभा करण्यात पंडीत जवाहरलाल नेहरुंपासून काॅंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी कष्ट घेतले. रेल्वे, विमान सेवा, टेलिफोन सेवा, भेल सारखी वीज निर्माण करणारी कंपनी सुरू केली. पण आमचे सरकार गोर-गरीबांचे सरकार असेल, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू, दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, उत्पादन दुप्पट करण्याची स्वप्न दाखवली.

आमचा गोर-गरीब शेतकरी देखील या भूलथापांना बळी पडला आणि २०१४ मध्ये मोदी सरकार देशात सत्तेवर आले. पण सत्तेवर येताच यांनी काय केले, नोटबंदी, जीएसटी, लाॅकडाऊन सारखे आत्मघातकी निर्णय घेतले. काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी केल्याचा दावा केला, पण झाले काय तर गरीबांना बॅंकापुढे आपलेच पैसे काढण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या. अचानक लाॅकडाऊनची घोषणा केल्यामुळे लाखो व्यवसाय, उद्योग बुडाले, तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, देशाची आर्थिक अवस्था बिकट झाली, रुपया घसरला.

अमित शहांची संपत्ती कशी वाढली?

एकीकडे देशातील उद्योग धंदे डबघाईला आले, तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, तर दुसरीकडे हम दो हमारे दो यांची संपत्ती मात्र तासाला नव्वद कोटींनी वाढत होती. मग तुम्ही कुणाचे एजंट म्हणून काम करत होतात, याचे उत्तर द्या. अमित शहा यांची संपत्ती किती पटीने वाढली, असा सवाल देखील पटोले यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मनमोहनसिंग सरकारने स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. काॅंग्रस सरकारच्या काळात या आयोगाच्या ६० शिफारशी स्वीकारल्या गेल्या. उर्वरित शिफारशींवर अभ्यास सुरू असतांनाच केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. आम्ही स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी स्वीकारू असे सांगणाऱ्या याच सरकारने पुढे सर्वोच्च न्यायालयात आम्ही या शिफारशी स्वीकारणार नाही असे शपथ पत्र लिहून दिले.

आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी न्याय हक्कासाठी आंदोलन करतोय, दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचा या आंदोलना दरम्यान बळी गेला, पण त्यांच्यासाठी मोदींच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाही. या अन्नदात्याचा देखील मोदींनी विश्वासघात केला. म्हणून आता मोदी सरकार चलेजावचा नारा आपण याच ऐतिहासिक क्रांती मैदानावर देत आहोत, असेही पटोले यांनी सांगितले.

देश विकायला निघालेल्या मोदींनी रेल्वे, एलआयसी, भेल, टेलिफाेन कंपन्या विकल्या. आता देशाची शान असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोकण रेल्वे देखील यांनी विकायला काढली आहे. पण या पुढे महाराष्ट्रातील एकही सरकारी कंपनी मोदींना विकू देणार नाही, त्यासाठी राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पटोले यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख