गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबत गुन्हेगारांचे फोटोसेशन.. - Home Minister Anil Deshmukh with photo session of criminals with serious crimes | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबत गुन्हेगारांचे फोटोसेशन..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

गृहमंत्र्यांसोबत असलेल्या या तीन गुन्हेगारांपैकी एकावर चक्क पाचशे ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून ते विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर दुसऱ्या एकावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. त्याला औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तडीपार करण्याची देखील कारवाई प्रस्तावित केलेली आहे.तर आणखी एकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

औरंगाबाद ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपुर्वी औरंगाबादचा दौरा केला. राज्यात महिला सुरक्षिततेसाठी होऊ घातलेल्या नव्या शक्ती कायद्या संदर्भात समितीची बैठक घेण्यासाठी ते शहरात आले होते. त्यांचा हा दौरा आता एका वेगळ्याच कारणाने वादात सापडलाय. सुभेदारी विश्रामगृहावर अनिल देशमुख यांच्या सोबत चक्क गुटखा किंग, बलात्काराचे आरोप असलेला व ट्रक चोरी करून त्याचे सुटे भाग विकल्याचा गुन्हा असलेले तीनजण फोटोत असल्याचे समोर आले आहे. खुद्द राज्याच्ये गृहमंत्रीच गुन्हेगारांसोबत फोटोमध्ये दिसत असल्याचे याची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

अनिल देशमुख यांच्या या दौऱ्या निमित्त त्यांना सुभेदारी विश्रामगृहात भेटणाऱ्यांची संख्या मोठी होती. यात पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा देखील समावेश होता. शहरातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने अनिल देशमुख यांची भेट घडवून आणत अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळवून दिली. पण या भेटीगाठी आणि फोटो सेशन मध्ये चक्क तडीपार, गुटखा किंग, बलात्काराचे आरोप व ट्रकचे सुटे भाग विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गुन्हेगारही होते. या भेटीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली.

आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या व्हाईट काॅलर गुन्हेगारांची गृहमंत्र्यांशी भेट कुणी घालून दिली. पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी सुभेदारीवर उपस्थित असतांना कुणीच याची माहिती गृहमंत्र्यांना दिली नाही का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत..

गृहमंत्र्यांसोबत असलेल्या या तीन गुन्हेगारांपैकी एकावर चक्क पाचशे ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून ते विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर दुसऱ्या एकावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. त्याला औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तडीपार करण्याची देखील कारवाई प्रस्तावित केलेली आहे.तर आणखी एकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या फोटोत गृहमंत्र्यांच्या बाजूला असलेले गुन्हेगार कलीम कुरेशी हा गुटखा किंग म्हणून ओळकला जातो. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पोलीस अजूनही तपास करत आहेत .सय्यद मतीन  याच्यावर बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल आहेत. मतीनवर देखील तडीपारीची कारवाई प्रस्तावित असल्याचे समजते. तर तिसरा गुन्हेगार जफर बिल्डर याच्यावर पाचशे ट्रकची चोरी करून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या टोळीत नाव आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख