बीड: नुकत्याच झालेल्या ग्रामपंतायत निवडणुका आणि त्याचे लागलेले निकाल यातून जिल्ह्यातील मी मी म्हणणाऱ्या नेत्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. ग्रामपंचायत आणि विधानसभेच्या मतदानाचा फारसा संबंध नसला तरी यातून कुणाची किती ताकद आणि यंत्रणा सक्षम आहे हे यातून दिसून येत असते. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांना आत्मपरिक्षण करायला लावणारे निकाल ग्रामपंचायत निवडणुकीत लागले आहेत. यातून धडा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करतांना आपली ताकद आणि गावपातळीवरचे जाळे अधिक घट्ट करणे गरजेचे आहे, असा संदेशच कालच्या निकालातून दिला गेला आहे.
बीड जिल्हा हा मराठवाड्यातील राजकारणाचा नेहमीच केंद्र बिंदू राहिला आहे. या जिल्ह्याने राज्याला आणि देशाला देखील सक्षम नेतृत्व दिलेले आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली गाजवणारी महाराष्ट्रातील बरीच नावे ही बीड जिल्ह्यातील असल्याचे आपल्याला पहायला मिळेत. त्यामुळे महत्वाकांक्षा आणि राजकारणात घट्टपणे पाय रोवून उभी राहण्याची वृत्ती या मातीत अधिक असल्याचे पहायला मिळाले आहे. पण सत्ता, मंत्रीपद आणि कितीही मोठे पद मिळाले तरी गावाशी जोडलेली नाळ कुठल्याही परिस्थितीत तुटू देता कामा नये. यात गल्लत झाली तर मतदार आणि सर्वसामान्य जनता तुम्हाला सूचक इशारा दिल्याशिवाय राहत नाही.
असेच काहीसे जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या बाबतीत घडल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळाले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा व भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना मतदारांनी वेळीच सावध व्हा, असा धोक्याचा इशारा दिल्याचे दिसते. . विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या आणि विरोधक अशा सगळ्यांनाच आपले नेतृत्व आणि पकड तपासण्याचा संदेश या गावगाड्याच्या निवडणुकीतून मिळाला आहे.
ग्रामपंचायतींचे मतदान हे स्थानिक हितसंबंध आणि हेव्यादाव्यांतून होते. पण, यातून विजयी आणि पराभूत होणार हा कुठल्या न कुठल्या राजकीय पक्ष, नेत्यांशी जोडला गेलेला, बांधील असतो. भविष्यात होणाऱ्या महत्वाच्या निवडणुकांमध्ये अशा गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या हातातच नेत्यांच्या प्रचाराची यंत्रणा असते. त्यामुळे नेत्यांमागे असलेल्या जनमताप्रमाणेच या उमेदवारांमागचे जनमतही नेत्यांच्या कामी येते. ग्रामपंचायती ताब्यात असतील तर नेत्यांनी दिलेला विकास निधी चांगल्या प्रकारे खर्च होतो. अशा निवडणुकांत स्थानिक नेत्यांना दिलेले बळ आणि पुरविलेली रसद भविष्यात नेत्यांसाठी उपयोगी पडते.
शिवसेना-राष्ट्रवादीची सरशी
विजयी झालेल्या उमेदवारांची आणि ग्रामपंचायतींबाबत नेत्यांकडून केले जात असलेले दावे तेवढेसे खरे नाहीत. पण, या निकालात जिल्ह्यात राष्ट्रवादी, शिवसेनेने चमकदार कामगिरी केल्याचे नाकारता येणार नाही. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी होमपिचवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, नगर पालिका निवडणुकीत भाजपच्या पिछेहाटीची सुरु असलेली मालिका या ग्रामपंचायत निवडणुकीतही कायम राहीली. ही भाजपसाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. संपर्कातील सातत्याचा अभाव याला कारणीभूत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
अशीच काहीशी स्थिती विनायक मेटेंची शिवसंग्रामच्या बाबतीतही दिसली. मागच्या निवडणुकीची तुलना केली, तर यावेळी त्यांची कामगिरी अधिकच खालावली आहे. त्यांच्याबाबतीत देखील संपर्कातील अभाव हेच कारण प्रकर्षाने जाणवते. जिल्ह्यातील तरूण नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते संदीप क्षीरसागर देखील आमदार झाल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीत बदल आणि स्थानिक संपर्कातील अभावामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत.
जिल्ह्यातील राष्टरवादीचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असलेले प्रकाश सोळंके मंत्रीपद नाकारल्याने नाराज होते. परिणामी वर्षभरापासून ते फारसे सक्रीय दिसले नाही. परिणामी त्यांच्याच तालुक्यात राष्ट्रवादीची सुमार कामगिरी झाली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले आमदार बाळासाहेब आजबे यांचा अवाका आणि नेटवर्क देखील मर्यादित असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. राज्यात सत्तेतील महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आलेल्या अपयशाला त्या त्या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे हे उघड आहे.
स्थानिक निवडणुकीकडे कानाडोळा..
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परळी व इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला रोखता आले नाही. यामागे त्यांच्या कमी झालेला संपर्क हे कारण जरी असले तरी भाजपच्या केजच्या आमदार यांचा संपर्क चांगला असला तरी स्थानिक निवडणुकीकडे फारसे गांभीर्याने न पाहण्याचा त्यांच्या दृष्टीकोन नडला. त्याचाच परिणाम भाजपच्या केज मतदार संघातल्या कामगिरीवर दिसला.
लक्ष्मण पवारांनाही सुरुवातीपासून ग्रामीण नेटवर्क उभारता आले नाही. मात्र, त्यांना आतापर्यंत मतदारांनी तारुन नेले. फक्त आपली निवडणुक पाहून भागत नसते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. बीड तालुका हा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र होमपिच आहे. पद मिळाले असले तरी या कालावधीत या तालुक्यात भाजप किती व कुठेय याचा विचार आता मस्केंनी करण्याची वेळ आली आहे.
Edited By : Jagdish Pansare

