दहा रुपयांचे मोबाईल रिचार्ज माजी खासदारांना ४९ हजारांत पडले.. - Former MP's online bribe of Rs 49,000 More about former | Politics Marathi News - Sarkarnama

दहा रुपयांचे मोबाईल रिचार्ज माजी खासदारांना ४९ हजारांत पडले..

गणेश पांडे
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

दहा रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिटकार्डचा वापर केला. तेव्हा काही क्षणातच सोपान फाळके यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून ४९ हजार रुपये काढून घेतले असल्याचा मॅसेज आला. 

परभणी ः आॅनलाईन व्यवहार करणे कधीकधी किती अंगलट येते याचा अनुभव परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे यांना देखील आला. मोबाईलचे रिचार्ज करण्यासाठी आॅनलाईन अॅप्लीकेशन डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून तब्बल ४९ हजार रुपये गायब झाले. या प्रकरणी मंगळवारी रात्री नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आॅनलाईन खरेदी व व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आकर्षक आॅफर, सुटच्या अमिषाला बळी पडून अनेकजण स्वतःचे नुकसान करून घेतात. सरसकट सगळ्याच आॅनलाईन व्यवहरांमध्ये फसवणूक होते असे नाही, पण अनेकदा याचा सर्वसामान्यांना फटका बसतो. परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे यांना देखील तो बसला आहे.

मोबाईलचे सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता रेंगे यांनी अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केले होते. ते डाऊनलोड होताच क्षणार्धात त्यांच्या बॅंक खात्यातून ४९ हजार रुपये काढले गेले. पैसे कपात झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.नऊ) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

तुकाराम रेंगे पाटील यांना मंगळवारी एक मॅसेज आला होता. यामध्ये तुमच्या दोन्ही मोबाईलचे सीमकार्ड बंद पडले आहेत, ते अॅक्टीव्ह करा, असे सूचवण्यात आले होते. रेंगे यांनी लगेच सीमकार्ड रिचार्ज करण्यासाठी सोपान फाळके या आपल्या सहकाऱ्यास पाठवले. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करत दोन्ही सीमकार्ड लागलीच चालू करण्यासाठी केवळ दहा रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, असे सांगितले.

त्यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल, अशी पुष्टीही जोडली. त्यामुळे रेंगे यांनी फाळके यांना फोनवरून हा विषय सांगितला आणि त्यांनी अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केले. दहा रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिटकार्डचा वापर केला. तेव्हा काही क्षणातच सोपान फाळके यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून ४९ हजार रुपये काढून घेतले असल्याचा मॅसेज आला. 

या मॅसेजने अ‍ॅड. रेंगे यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याबरोबर नानलपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख