औरंगाबाद ः महिला अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर देखील यापुढे कारवाई केली जाणार, असे सांगताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी औरंगाबादेतील `त्या` तक्रारीचा दाखला दिला. त्यामुळे गृहमंत्र्यांनी या तक्रारीतील आरोपी असलेल्या राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना क्लीनचीट दिली का? अशी चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्र्यांच्या या विधानाला पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी देखील दुजोरा देत लवकरच आम्ही सदर महिलेचा जबाब आणि इतर सर्व कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचे सांगितले.
दोन महिन्यापुर्वी औरंगाबादेतील सिडको पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. मेहबूब शेख यांनी तक्रार दाखल झालेली व्यक्ती मीच आहे की अन्य कुणी याचा पोलीसांनी तपास लावावा. माझी आणि तक्रारदार महिलेची नार्को टेस्ट करावी, अशी म्हणत तक्रारदार महिलेचे सर्व आरोप फेटाळले होते. परंतु आपल्यावर अत्याचार करणारा आरोपी हा राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष मेहबूब शेख हाच आहे, असा दावा तक्रारदार महिलेने केला होता.
परंतु सुरूवातीपासूनच या प्रकरणाकडे पोलीसांनी तांत्रिक गुन्हा म्हणून पाहत तपास केला. या संदर्भात मेहबूब शेख यांच्यासह तक्रारदा महिलेचा जबाब देखील पोलिसांनी घेतला. आता ती तक्रार खोटी होती, अशी माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे महेबूब शेख यांना एकप्रकारे क्लीन चीटच मिळाल्याचे बोलले जाते.
सदर महिलेने मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्यभरात आंदोलन करत शेख यांना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच गृहमंत्री आणि राज्य सरकार आरोपीला वाचवू पाहत आहे, पोलीसांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप देखील केला होता.
Edited By : Jagdish Pansare

