नामांतरला नुसता विरोध नको, सत्तेतून बाहेर पडा; आठवलेंचा काॅंग्रेसला सल्ला.. - Don't just oppose renaming, get out of power; Athavale's advice to Congress | Politics Marathi News - Sarkarnama

नामांतरला नुसता विरोध नको, सत्तेतून बाहेर पडा; आठवलेंचा काॅंग्रेसला सल्ला..

शिवचरण वावळे
सोमवार, 18 जानेवारी 2021

नामांतराला आमचा विरोध नसला, तरी कॉँग्रेसचा प्रखर विरोध आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातुन औरंगाबादचा संभाजीनगर असा नामोल्लेख केला जातोय ते चुकीचे आहे. या मुद्यावर आता महाआघाडीतून कॉँग्रेसने बाहेर पडावे. भाजप सत्ता स्थापनेसाठी तयार आहे, असेही आठवले म्हणाले.
 

नांदेड : औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याच्या मुद्यावरून आता महाविकास आघाडीतून कॉँग्रेसने बाहेर पडावे, असा सल्ला देत आम्ही सत्ता स्थापन करायला तयार आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

नांदेडला कामगार मेळावा आणि बिलोली येथील दिव्यांग मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचार व हत्या झालेल्या पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आठवले आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी औरंगाबादच्या नामांतर मुद्यावरून काॅंग्रेसला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.

महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर आणि औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. नामांतराला आमचा विरोध नाही. विमानतळाचे नाव बदलायचे असेल, तर एलोराचे आजिंठा असे नामकरण करावे. शिवसेना मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकाचे देखील नामांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी सुचना आम्ही केली आहे.

नामांतराला आमचा विरोध नसला, तरी कॉँग्रेसचा प्रखर विरोध आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातुन औरंगाबादचा संभाजीनगर असा नामोल्लेख केला जातोय ते चुकीचे आहे. या मुद्यावर आता महाआघाडीतून कॉँग्रेसने बाहेर पडावे. भाजप सत्ता स्थापनेसाठी तयार आहे, असेही आठवले म्हणाले.

बिलोली येथील मातंग समाजाच्या दिव्यांग मुलीवर सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्याचा प्रकार हा दुर्देवी आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या वतीने साडेचार लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने देखील पन्नास हजाराची मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राने पारित केलेल्या शेतकरी कायदा हा चांगला असून, या कायद्याविरोधात एकही शेतकरी नाही. कायद्याचा विरोध करणारे शेतकरी संघटनेचे नेते असून, कायदा रद्द करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, अशा पद्धतीने कायदे मागे घेतल्यास भविष्यात कायदे मागे घेण्याची प्रथा पडेल, अशी भीती देखील आठवले यांनी व्यक्त केली.

मुंडे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ठोस भुमिका घ्यावी..

धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घ्यावी. धनंजय मुंडे यांच्याविषयी आमच्या मनात कुठलाही द्वेष नाही. मात्र, त्यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचायचे आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत असून आम्ही १२० जागा जिंकू तसेच भाजपचा महापौर झाल्यास उपमहापौर हा आमच्याच पक्षाचा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख