मुंडेंच्या ताब्यातील संस्थांमधील नाराजी चव्हाट्यावर; परळीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास

स्थानिक संस्थांवर पुर्वीपासूनच धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अंबाजोगाईची पंचायत समितीही त्यांच्या ताब्यात आली होती. दोन्ही संस्थांमध्ये अंतर्गत कारभारावरुन नाराजी नाट्य रंगले आहे.
minister dhnanjay munde news parali
minister dhnanjay munde news parali

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अंतर्गत नाराजीनाट्य आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. यातूनच परळी पंचायत समितीच्या सभापतीविरुद्ध गुरुवारी अविश्वास ठराव मंजूर झाला.

परळी पालिकेत सत्तांतर घडवून राज्यात धम्माल उडवून राजकीय बंड करणाऱ्या धनंजय मुंडे यांना त्यानंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अपयश आले. मात्र, त्यानंतर बाजार समिती व मागच्या वेळी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी परळी मतदार संघात एकतर्फी यश मिळविले. यावेळीही त्यांनी परळी नगर पालिका निवडणुक एकतर्फी जिंकली. त्यामुळे परळी मतदार संघातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत.

दरम्यान, अंबाजोगाई पंचायत समितीही राष्ट्रवादीच्याच ताब्यात होती. परंतु, त्यावेळी मुंदडा राष्ट्रवादीत असल्याने त्यावर मुंदडांचे लेबल होते. विधानसभा निवडणुकीवेळी मुंदडा भाजपातून राष्ट्रवादीत गेले आणि नंतर झालेल्या पंचायत समिती सभापती - उपसभापती निवडीवेळी ही पंचायत समिती पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडे यांना यश आले. एकूणच मुंदडांच्या पक्षबदलामुळे धनंजय मुंडेंना कार्यक्षेत्र विस्ताराची संधी या निमित्ताने भेटली.

अंबाजोगाईतही खदखद..

परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे नऊ तर भाजपचे केवळ तीन सदस्य आहेत. वर्षभरापूर्वीच्या निवडीवेळी उर्मिला गित्ते यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. मात्र, सभापतींच्या एककल्ली कारभारामुळे सदस्यांत नाराजी वाढायला सुरुवात झाली. निधी वाटपात असमानतेच्या तक्रारी सुरु झाल्या. वर्षभराने तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यात फटका बसेल म्हणून अखेर सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करुनन गुरुवारी १० विरुद्ध एक असा अविश्वास मंजूर करण्यात आला.

तीच गत अंबाजोगाई पंचायत समितीमध्येही सुरु आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विजयमाला जगताप सभापती आहेत. मात्र, सहा महिन्यांपासून उर्वरित ११ सदस्य त्यांच्या विचरोधात आहेत. अगदी पाच मासिक सभांना सदस्य गैरहजर राहिले, तर मागच्या सभेतही केवळ एका ठरावाला मान्यता देऊन उर्वरित सर्व ठरावांना विरोध केला गेला. परळीत सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावाचे अस्त्र उगारण्यात आले. आता अंबाजोगाईत काय होणार हे पहावे लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com