बागडे पडले की त्यांना पाडले? याचीच चर्चा.. - Did the District Bank lose in the election or did they fall? That's the discussion | Politics Marathi News - Sarkarnama

बागडे पडले की त्यांना पाडले? याचीच चर्चा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे याच मतदारसंघातून सहज विजयी झाले. एवढेच काय पण भाजपच्या नवख्या अभिषेक जैस्वालने बागडे यांच्यापेक्षा अधिकची मते घेत विजय मिळवला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील एक महत्वाची सहकारी बॅंक म्हणून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे पाहिले जाते. सर्व पक्षीय संचालक मंडळ असून देखील या बॅंकेचा कारभार बरा सुरू आहे. बॅंकेचे दिवगंत अध्यक्ष व सर्वाधिक काळ चेअरमन राहिलेल्या सुरेश पाटील यांच्या पश्चात झालेली जिल्हा बॅंकेची ही पहिली निवडणूक. पण या निवडणुकीत ज्या नेत्याने सगळे पक्ष एकत्र आणून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले, त्याच्याच नशिबी पराभव आल्याचे पहायला मिळाले.

गेली १५-२० वर्ष जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून कार्यरत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलच्या विजयापेक्षा त्यांच्या वैयक्तिक पराभवाचीच सर्वाधिक चर्चा सध्या सुरू आहे. आता बागडे खरंच पडले की त्यांना पाडले? हा प्रश्न आहे.

हरिभाऊ बागडे यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. गावातील दुध सोसायटी, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष, देवगिरी नागरी सहकारी बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष, छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखाना आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव. मग अशी व्यक्ती बिगरशेती मतदारसंघातील दहा पैकी पाच उमेदवारांमध्ये देखील निवडून येऊ नये याचे आश्चर्य वाटते.

या ऊलट पहिल्यांदाच सहकारी बॅंकेची निवडणूक लढवणारे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे याच मतदारसंघातून सहज विजयी झाले. एवढेच काय पण भाजपच्या नवख्या अभिषेक जैस्वालने बागडे यांच्यापेक्षा अधिकची मते घेत विजय मिळवला.

त्यामुळे यावेळी हरिभाऊ बागडे यांना जिल्हा बॅंकेतून बाहेर काढायचे हे ठरवून त्या दृष्टीनेच रणनिती आखली गेली होती हे स्पष्ट झाले. अर्थात यात बागडे यांचे राजकीय विरोधक काॅंग्रेसचे माजी आमदार व विद्यमान जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांची महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते.

पॅनलसाठी पुढाकार अन् पराभव..

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काॅंग्रेस वगळून पॅनल देण्याची तयारी सुरू केली होती. यासाठी भाजपला सोबत घेण्याची तयारी देखील शिवसेनेने केली. कॅबिनेट मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक असलेले संदीपान भुमरे यांना देखील सत्तार यांनी त्यासाठी तयार केले. तर आमदार अंबादास दानवे यांना संचालक करण्याच्या अटीवर त्यांना देखील सोबत घेतले.

राज्याच्या सत्तेत शिवसेनेचा कट्टर शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला सोबत घेत सत्तार यांनी शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली खरी, पण हे पॅनल तयार करण्यात हरिभाऊ बागडे यांचा देखील महत्वाचा वाटा होता. बागडे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, हे सांगायला शिवसेनेचे नेते विसरत नव्हते. पण निकालानंतर बागडे यांचे नेतृत्वच जिल्हा बॅंकेच्या राजकारणातून हद्दपार झाल्याचे पहायला मिळाले.

बागडेंचा पराभव आमच्या फार जिव्हारी लागला असे दाखवत शिवसेनेच्या नेत्यांनी गड आला पण सिंह गेला वगैरे प्रतिक्रिया देत वेळ मारून नेली, पण बागडे यांचा पराभव का झाला? याचा शोध शेतकरी विकास पॅनलच्या प्रमुख नेत्यांना घ्यावासा वाटला नाही

काॅंग्रेसच्या शेतकरी सहकार बॅक पॅनलचे सर्वेसर्वा माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांची आणि राज्यमंत्री सत्तार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. सत्तार काॅंग्रेसमध्ये असतांना काळे सतत त्यांच्या सोबत सावली सारखे वावरायचे. त्यामुळे बागडे यांचा पराभव करण्यासाठी काळेंना सत्तार यांचा हातभार तर लागला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर तिकडे बागडे यांचा रोख देखील कल्याण काळे यांच्याकडेच असल्याचे दिसून आले. बिगरशेती मतदारसंघातून माझा पराभव करण्यासाठी विरोधकांनी मतदारांना काही दिले असेल? असा आरोप बागडे यांनी पराभवानंतरच्या प्रतिक्रेयत केला होता. एकंदरित बागडे यांचा जिल्हा बॅंकेतील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख