उस्मानाबाद ः औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा मुद्दा पुढे आला. यावरून राज्यभरात शिवसेना विरुध्द काॅंग्रेस, भाजप, मनसे असा संघर्ष सुरू झाला आहे. यातच भाजपने आता उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार असे म्हणत शहरात ठिकठिकाणी नमस्ते धाराशीवचे फलक लावले आहेत. शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राज्यात भाजपची सत्ता होती तेव्हा पाच वर्ष तुम्ही काय केले? झोपा काढल्या का? असा सवाल त्यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही तोच उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला नामांतराच्या मुद्यावरून डिवचले. दोन दिवसांपुर्वी भाजयुमोच्या वतीने शहरात नमस्ते धाराशीवचे फलक लावण्यात आले. यावरून जिल्ह्यातील राजकारण तापले असून शिवसेना विरुद्ध भाजप असा भडका उडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धाराशीवच्या मुद्यावर शिवसेना गप्प का? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे. यावर आता शिवसेनेने देखील पलटवार केला.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भाजपचे जिल्ह्यातील एकमेव निवडूण आलेले आमदार राणाजगतिसिंह पाटील यांना टोला लगावत या आधी तुम्ही कधी उस्मानाबादचे धाराशीव करा, अशी मागणी केली होती का? की या संदर्भात कधी पत्रव्यव्हार केला. मग आताच तुम्हाला धाराशीवची आठवण कशी झाली? हा शुद्ध ढोंगीपणा आहे. शिवसेना या विषयावर गप्प का? हे विचारण्याचा अधिकार यांना मुळीच नाही.
शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासूनच उस्मानाबादला धाराशीव आणि औरंगाबादला संभाजीनगर हे नाव दिले गेले आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरांना ही नावे दिली. शिवसेनेचा प्रत्येक नेता, आमदार, खासदार, पदाधिकारी, शिवसैनिक उस्मानाबाद नाही तर धाराशीव म्हणतो. तेव्हा भाजपने दुटप्पी भूमिका घेऊ नये.
राज्यात तुमची सत्ता असतांना तुम्ही धाराशीव का केले नाही? तेव्हा झोपा काढल्या का? असा सवाल करतांनाच उस्मानाबादचे धाराशीव आणि औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून लवकरच तुम्हाला ते कळेल, असेही ओमराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
Edited By : Jagdish Pansare

